
मुंबई, २१ जानेवारी (हिं.स.) : कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचा महापौर होणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे. या महापालिकांच्या महापौरपदाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर होणार असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. मात्र मुंबई महापालिकेबाबत काय निर्णय घेणार, ही बाब अद्याप गुलदस्त्यात आहे.
कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि ठाण्यात शिंदे गट इतर राजकीय पक्षाच्या मदतीने सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या तिन्ही महापालिकेत शिंदे गटाने पावले उचलल्याने भाजपाचं टेन्शन वाढलं होतं. तिन्ही पालिकेत भाजपा आणि शिंदेसेनेत तोडगा न निघाल्याने एकनाथ शिंदेंनी भाजपाला वगळून सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, भाजपाने अचानक शिंदे गटासोबत सत्ता स्थापनेसाठी युती करण्यासाठी पाऊल पुढे टाकलं आहे. परंतु या युतीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केले.
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या तिन्ही महानगरपालिकांमध्ये महायुतीचा महापौर होण्यासंदर्भात यापूर्वीच गेल्या आठवड्यात झालेल्या भेटीत सविस्तर चर्चा झाली आहे. तीनही महानगरपालिकांमध्ये महायुतीला जनादेश मिळाला आहे. त्यामुळे या जनादेशानुसारच तीनही महानगरपालिकेत महायुतीचीच सत्ता स्थापन होणार, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी