
मेलबर्न, 21 जानेवारी (हिं.स.)भारताचा युकी भांब्री आणि त्याचा स्वीडिश जोडीदार आंद्रे गोरान्सन यांनी मेलबर्नमध्ये स्थानिक वाईल्ड कार्ड टेनिसपटू जेम्स डकवर्थ आणि क्रूझ हेविट यांचा पराभव करून ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ च्या पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
भारताचा अव्वल मानांकित पुरुष दुहेरी टेनिसपटू जागतिक क्रमवारीत २१ व्या क्रमांकावर असलेला युकी भांब्री आणि आंद्रे गोरान्सन यांनी अवघ्या ५७ मिनिटांत ६-३, ६-४ असा विजय मिळवला.
वर्षातील पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत १० वे मानांकन मिळालेल्या या इंडो-स्वीडिश जोडीने संपूर्ण सामन्यावर आपले वर्चस्व राखले आणि त्यांची सर्व्हिस जवळपास निर्दोष होती.
पहिल्या सेटमध्ये त्यांनी पाचपैकी चार सर्व्हिस गेम्स 'लव्ह'वर जिंकले. फक्त नवव्या गेममध्ये एकच गुण गमावला. माजी जागतिक क्रमवारीत नंबर १ आणि अनेक ग्रँडस्लॅम विजेत्या लेटन हेविटचा मुलगा असलेल्या जेम्स डकवर्थ आणि क्रूझ हेविट यांच्याविरुद्ध आठव्या गेममध्ये मिळालेला ब्रेक सेट जिंकण्यासाठी पुरेसा ठरला.
दुसऱ्या सेटमध्येही हाच क्रम कायम राहिला. जिथे भांब्री आणि गोरान्सन यांनी पुन्हा एकदा त्यांच्या पाचपैकी चार सर्व्हिस गेम्समध्ये एकही गुण न गमावता विजय मिळवला. सातव्या गेममधील निर्णायक ब्रेकने सामना जिंकून दिला.
पुढील फेरीत भांब्री - गोरान्सन यांचा सामना मेक्सिकोच्या सँटियागो गोन्झालेझ, नेदरलँड्सच्या डेव्हिड पेल किंवा ब्राझीलच्या मार्सेलो मेलो आणि फर्नांडो रोम्बोली यांच्यापैकी एका जोडीशी होणार आहे.
भांब्रीची ऑस्ट्रेलियन ओपनमधील सर्वोत्तम कामगिरी २०१४ मध्ये झाली होती. जेव्हा तो न्यूझीलंडच्या मायकेल व्हेनससोबत तिसऱ्या फेरीत पोहोचला होता.
ग्रँडस्लॅममधील त्याची सर्वोत्तम कामगिरी गेल्या वर्षी झाली. जेव्हा या जोडीने अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.
यापूर्वी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष दुहेरीच्या ड्रॉमध्ये असलेला एकमेव भारतीय टेनिसपटू निकी कलियंडा पूनाचा पहिल्याच फेरीत बाहेर पडला. पूनाचा आणि त्याचा थाई जोडीदार प्रुचिया इसारो यांना मंगळवारी स्पेनच्या पेड्रो मार्टिनेझ आणि जौमे मुनार यांच्याकडून ७-६(३), ७-५ असा पराभव सहन सरावा लागला.
युकी भांब्री मेलबर्नमध्ये मिश्र दुहेरीच्या स्पर्धेत अमेरिकेच्या २०१८ विम्बल्डन चॅम्पियन निकोल मेलिचार-मार्टिनेझसोबत खेळणार आहे. पहिल्या फेरीत त्यांची लढत सहावे मानांकन असलेल्या पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या झांग शुआई आणि जर्मनीच्या टिम पुट्झ यांच्याशी होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे