
हॅमिल्टन, 17 मार्च (हिं.स.)न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी२० मालिकेतील दुसरा सामना न्यूझीलंडने ६८ धावांनी जिंकला. या सामन्यानंतर मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, न्यूझीलंडने आपल्या निर्धारित २० षटकांत ६ विकेट्स गमावून १७५ धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेसमोर १७६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला १५.३ षटकांत केवळ १०७ धावा करता आल्या. अशाप्रकारे, न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा ६८ धावांनी पराभव केला.
१७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीपासूनच संघर्ष करावा लागला. ३१ धावांपर्यंत दक्षिण आफ्रिकेचे तिन्ही आघाडीचे फलंदाज बाद झाले होते. रुबिन हरमनने १९ धावा केल्या, तर जॉर्ज लिंडेने १२ चेंडूंमध्ये ३३ धावा करून दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही.
दक्षिण आफ्रिकेच्या डावात एक वेळ अशी आली होती, जेव्हा संघाने ४ षटकांत ३२ धावा केल्या आणि ६ विकेट्स गमावल्या. तिथून पुनरागमन करणे अशक्य होते. अखेरीस, दक्षिण आफ्रिका केवळ १५.३ षटकेच खेळू शकली आणि १०७ धावांवर सर्व फलंदाज बाद झाले.
न्यूझीलंडकडून, वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने कहर केला, ३.३ षटकांत केवळ १६ धावा देत ३ विकेट्स घेतले. त्याने एक निर्धाव षटकही टाकले, जे टी२० क्रिकेटमध्ये खूप दुर्मिळ आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे