एकल महिला समाजाला पुढे नेणारी मौन शक्ती - डॉ.शेफाली भुजबळ
येवला, 26 जानेवारी (हिं.स.)महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री स्वातंत्र्याचा विचार केवळ शब्दांत मांडला नाही, तर तो कृतीतून जगला. त्या काळात विधवा स्त्रियांवर अन्याय, अपमान आणि सामाजिक बहिष्कार लादला जात असताना, मह
एकल महिला समाजाला पुढे नेणारी मौन शक्ती - डॉ.शेफाली भुजबळ


येवला, 26 जानेवारी (हिं.स.)महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री स्वातंत्र्याचा विचार केवळ शब्दांत मांडला नाही, तर तो कृतीतून जगला. त्या काळात विधवा स्त्रियांवर अन्याय, अपमान आणि सामाजिक बहिष्कार लादला जात असताना, महात्मा फुले यांनी विधवा पुनर्विवाहाचा निर्भीडपणे पुरस्कार केला, तर सावित्रीबाई फुले यांनी एकल व वंचित महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आयुष्य वेचले. पुण्यात त्यांनी विधवांसाठी आश्रय, शिक्षण आणि संरक्षणाची व्यवस्था उभी केली. समाजाने नाकारलेल्या एकल महिलांना फुले दांपत्याने माणूस म्हणून मान दिला. आज आपण एकल महिलांच्या सन्मान, हळदी-कुंकू आणि शासकीय सहाय्याच्या कार्यक्रमांद्वारे जे करत आहोत, त्याची बीजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांतच रोवलेली आहेत. त्यामुळे एकल महिलांचा सन्मान म्हणजे फक्त सामाजिक उपक्रम नाही, तर फुले दांपत्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम आहे, असे प्रतिपादन मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डॉ.शेफाली भुजबळ यांनी केले.

येवला माऊली लॉन्स येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान एकल महिला रोजगार प्रशिक्षण अर्थसहाय्य वितरण व हळदी कुंकू कार्यक्रम मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डॉ.शेफाली भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्या हस्ते एकल महिला रोजगार प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून ४० बचत गटाच्या महिलांना १ कोटी ४० लाखांचे अर्थसहाय्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनराध्यक्षा पुष्पा गायकवाड, प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, तालुका अभियान व्यवस्थापक डी.एच.जैन यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व एकल महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी डॉ.शेफाली भुजबळ म्हणाल्या की, एकल महिलांना एकत्र आणून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासोबत त्यांना सक्षम करून त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून हा हळदी कुंकू उपक्रम राबविण्यात येत आहे. महिलांना अधिक सक्षम होण्यासाठी बचतगट हे अतिशय महत्वाचे साधन आहे. त्यामुळे अधिक अधिक बचतगट निर्माण करून शासनाच्या विविध योजनाचा लाभ घेऊन अधिक सक्षम झाले पाहिजे. मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून आपण शासनाच्या विविध योजनांचा लाभ या महिलांना मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.भविष्यात एकल महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या अधिक संधी, कौशल्य प्रशिक्षणाचे स्वतंत्र कार्यक्रम, मुलांच्या शिक्षणासाठी विशेष मदत, सामाजिक सुरक्षा आणि सन्मानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande