नाशिक जिल्हा प्रगतीच्या नव्या पर्वात; कुंभमेळ्यासह भव्य विकासकामांना गती - महाजन
progress
नाशिक जिल्हा प्रगतीच्या नव्या पर्वात; कुंभमेळ्यासह भव्य विकासकामांना गती - महाजन


नाशिक, 26 जानेवारी (हिं.स.)।

, नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त केंद्र सरकार, राज्य शासन आणि प्राधिकरणाच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची विकास कामे मंजूर आहेत. नाशिक जिल्हा प्रगतीच्या नव्या पर्वात पदार्पण करीत असून कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कुंभमेळ्यासह भव्य विकासकामे गतीने सुरू झाली आहेत. असे प्रतिपादन जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक पोलीस परेड मैदान येथे शासकीय ध्वजारोहण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सीमा हिरे, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य एस. चोक्कलिंगम, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरिक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, मुख्य वनसंरक्षक जी मल्लिकार्जुन, कुंभमेळा विकास प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्ट कर्नल विलास सोनवणे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यानिमित्त मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. मंत्री श्री. महाजन यांनी संचलनाची पाहणी केली. सहाय्यक पोलिस अधीक्षक अद्विता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाने संचलन केले.

याप्रसंगी महाजन म्हणाले की, गेल्या काही वर्षांतील आव्हानात्मक काळातून विकासाचे नवे पर्व सुरू झाले असून, नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे मंजूर झाले आहेत. कुंभमेळा २०२६ च्या पार्श्वभूमीवर नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणामार्फत सर्व विभाग समन्वयाने कामे प्रगतीपथावर आहेत. प्रभू रामचंद्रांच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या नाशिकमध्ये ‘रामकाल पथ’ विकसित करण्यात येत असून, यामुळे नाशिक जागतिक आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येईल. शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन ६५ किलोमीटरचा बाह्य वळण रस्ता (रिंग रोड) प्रस्तावित असून, या प्रकल्पामुळे शहराचा विस्तार, औद्योगिक गुंतवणूक व

रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. कुंभमेळ्यासाठी सुरक्षा, पायाभूत सुविधा व पर्यावरणपूरक उपाययोजना यावर विशेष भर देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘घर-घर संविधान’ उपक्रमाअंतर्गत शाळा, महाविद्यालये व शासकीय संस्थांमध्ये संविधान जनजागृतीचे विविध कार्यक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. संविधानाच्या मूल्यांमुळे देशाची लोकशाही अधिक बळकट झाली असून भारताने जागतिक स्तरावर सक्षम राष्ट्र म्हणून ओळख निर्माण केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात १५ हजारांहून अधिक वृक्षलागवड करून ‘हरित नाशिक’ संकल्पना राबविण्यात येत असून पर्यावरण संवर्धनासाठी सर्व घटकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच शेतकऱ्यांसाठी पीक विमा, सन्मान निधी, ‘मागेल त्याला सौरपंप’ यांसारख्या योजनांद्वारे थेट लाभ दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

हवाई दलाने गंगापूर धरण परिसरात दाखवलेले 'सूर्यकिरण' प्रात्यक्षिक आपल्या तरुणांना सैन्यदलात भरती होण्यासाठी सदैव प्रेरित करत राहील. समारोप करताना महाजन यांनी नाशिक जिल्हा विकास, शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक सुरक्षिततेच्या क्षेत्रात नवे उच्चांक प्रस्थापित करेल, असा विश्वास व्यक्त करून सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी मनपा शाळा क्रमांक 16, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, सरस्वती नगर, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, पिंपळगाव गरूडेश्वर च्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर व आदिवासी नृत्ये सादर केले. यानंतर पोलीस परेड मैदानावर भारतीय सेनेच्या आर्टिलरी स्कूल देवळाली यांच्या वतीने आर्टिलरी रेजिमेंटच्या विविध शस्त्रसामग्रीचे, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांच्या उपकरणांचे प्रदर्शनास मंत्री श्री. महाजन यांनी भेट देत माहिती घेतली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलामार्फत ड्रोन शोचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.

150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे करण्यात आले. यात नाशिक जिल्ह्यातील पोलीस आयुक्त कार्यालयाची निवड झाल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे अभिनंदन केले.---------------------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande