

महलमध्ये लोया आणि रेशीमबागेत अभ्यंकरांनी केले झेंडावंदन
नागपूर, २६ जानेवारी (हि.स.) नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयांमध्ये सोमवार, प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज फडकवला गेला. महल परिसरातील संघ मुख्यालयात महानगर संघचालक राजेश लोया यांनी तर रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात संघाच्या अखिल भारतीय सेवा प्रमुख पराग अभ्यंकर यांनी झेंडा वंदन केले.
शहराच्या महाल परिसरातील मोहिते वाडा नावाने प्रसिद्ध संघ मुख्यालयाच्या इमारतीत सोमवारी सकाळी 8 वाजता झेंडवंदन समारंभ पार पडला. या प्रसंगी मुख्यालयाच्या सुरक्षेत असलेल्या सुरक्षा जवानांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. ध्वजारोहणानंतर महानगर संघचालक राजेश लोया यांनी गणतंत्र दिनाचे महत्त्व स्पष्ट करत आपले विचार मांडले. तर नागपूरच्याच रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरात सकाळी 9 वाजता राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. या प्रसंगी परिसराच्या सुरक्षेत असलेल्या पोलिस आणि गणवेशधारी स्वयंसेवकांनी राष्ट्रध्वजाला वंदन केले. कार्यक्रमात पराग अभ्यंकर यांनी भारतीय लोकशाही, संविधान आणि नागरिकांच्या कर्तव्यांबाबत आपले विचार मांडले.
--------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी