
पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपाने वाचले महिलेचे प्राण
अमरावती, 26 जानेवारी (हिं.स.) : प्रजासत्ताक दिनी सोमवारी अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उषा गोंडा (रा. संजय गांधी नगर क्रमांक १, अमरावती) या महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा गंभीर प्रयत्न केला. मात्र, गाडगे नगर पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठी दुर्घटना टळली आणि महिलेचे प्राण वाचले.
महिलेकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही नागरिकांनी त्यांची आर्थिक फसवणूक केली असून न्याय मिळवण्यासाठी त्यांनी वारंवार पोलीस स्टेशन व प्रशासकीय यंत्रणेकडे तक्रार केली. परंतु, कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे न्याय न मिळाल्याची भावना त्यांना निर्माण झाली. घटनेपूर्वी उषा गोंडाने पत्रकार परिषदेतून आत्मदहनाचा इशारा दिला होता.
आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पेट्रोलची कॅन घेऊन पोहोचलेल्या उषा गोंडाने स्वतःला जाळण्याचा प्रयत्न केला. हे लक्षात आल्यावर गाडगे नगर पोलिसांनी तत्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या कारवाईत गोपनीय अंमलदार अमोल पाटील, स्नेहल राऊत, पल्लवी गणेश यांच्यासह इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
संबंधित महिलेला पुढील चौकशीसाठी फ्रेजरपूरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनी घडलेल्या या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी