
नांदेड, 26 जानेवारी (हिं.स.)भारतीयांकडे “काहीच नव्हते” असा शिक्का मारून परकीय सत्तांनी आपल्या परंपरागत ज्ञान, कौशल्ये व कर्तृत्व कमी लेखले. त्याचा परिणाम म्हणून समाजाचा आत्मविश्वास खच्ची झाला. प्रत्यक्षात भारतात गुरुकुल व्यवस्था, कला-संगीत, शेती, पशुपालन व विज्ञान यांची समृद्ध परंपरा होती, जी अनुभवातून पिढ्यान्पिढ्या पुढे जात होती. आज त्या ज्ञानाचा अभिमान जागवून त्याचे दस्तऐवजीकरण व प्रमाणीकरण केले, तरच आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर आणि सशक्त होऊ, असा संदेश प्रमुख अतिथी उपेंद्र कुलकर्णी यांनी दिला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. श्री गुरु गोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक असलेले उपेंद्र कुलकर्णी सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम विभाग सेवा प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संकुलातील सर्व शैक्षणिक विभागांतील विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. तदनंतर विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली. विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
दरम्यान, सगरोळी ग्रामपंचायत येथे झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख यांनी माहिती देताना सांगितले की, संस्थेच्या माध्यमातून समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांच्या सहकार्याने पूरग्रस्त गावांतील कुटुंबांना आर्थिक मदत करण्यात येत आहे. तसेच शासन व केअरिंग फ्रेंड्स यांच्या सहकार्यातून मुखेड तालुक्यातील रावणगाव व हसनाळ येथील पूरग्रस्त कुटुंबांसाठी पक्की घरे बांधून देण्यात येणार असल्याची सांगत स्वाधार प्रकल्पाची घोषणा त्यांनी यावेळी केली.
आजच्या या शुभप्रसंगी संस्थेतील सैनिकी विद्यालयाच्या नूतन मार्तंड सदन या मुलांच्या नवीन वसतिगृहाचे भूमिपूजन उपेंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis