
बीड, 26 जानेवारी (हिं.स.)।महाराष्ट्र राज्य जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यात अध्यक्षपदी डॉ. सतीश हरिदास तर उपाध्यक्ष म्हणून बीडचे डॉ. सचिन शेकडे यांची यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या संघटनेच्या स्नेहसंमेलन आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत या निवडीची घोषणा करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया आणि कार्यकारिणी निवडणूक अधिकारी म्हणून डॉ. नितीन भालेराव यांनी काम पाहिले. संघटनेचे मावळते अध्यक्ष डॉ. राधाकृष्ण पवार व कोषाध्यक्ष डॉ. विवेक खतगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष म्हणून धाराशिवचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास, उपाध्यक्ष बीडचे माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सचिन शेकडे, डॉ. सई धुरी, सचिव डॉ. संतोष
कडले, कोषाध्यक्ष डॉ. प्रताप शिंदे यांचा समावेश आहे. या कार्यक्रमात नवनिर्वाचित कार्यकारिणीला त्यांच्या पदाचे अधिकृत प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर मावळत्या पदाधिकाऱ्यांनी नवीन टीमकडे पदभाराची सूत्रे सोपवली. जिल्हा आरोग्यअधिकारी संवर्गातील प्रश्नांची सोडवणूक करणे आणि संघटनेची बांधणी अधिक मजबूत करण्याचा निर्धार नूतन पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला. या स्नेहसंमेलनानिमित्त राज्यातील विविध जिल्ह्यांतील आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis