शहिदी समागम कार्यक्रमात भाविकांची मोफत एण्डोस्कोपी तपासणी
नांदेड, 26 जानेवारी (हिं.स.)। “हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागमनिमित्त येथील मोदी मैदानावर आयोजित कार्यक्रमाला येणाऱ्या भाविकांना गॅलक्सी हेल्थ केअर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने एण्डोस्कोपी चाचणीची सुविधा प
Q


नांदेड, 26 जानेवारी (हिं.स.)।

“हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागमनिमित्त येथील मोदी मैदानावर आयोजित कार्यक्रमाला येणाऱ्या भाविकांना गॅलक्सी हेल्थ केअर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने एण्डोस्कोपी चाचणीची सुविधा पुरविण्यात आली. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पहिले व एकमेव फिरते एण्डोस्कोपी रुग्णालय असलेल्या गॅलक्सी हेल्थ केअर चॅरिटेबल ट्रस्टमार्फत सलग दोन दिवस हा उपक्रम राबविण्यात आला. या दोन दिवसांत मोफत तपासणी व उपचार करत सेवाभाव जपला.

डॉ. नितीन जोशी यांनी सेवाभावी वृत्ती जोपासत हा उपक्रम सुरू केला असून, ग्रामीण भागातील रुग्णांना शहरात येऊन महागड्या तपासण्या करणे शक्य नसल्याने अशा गरजू रुग्णांसाठी ही सेवा सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या संस्थेची स्थापना चार वर्षांपूर्वी झाली असून, संस्थेचा चौथा वर्धापन दिन उद्या दि. २६ जानेवारी रोजी साजरा होत आहे. मागील चार वर्षांत संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत ११८ शिबिरे आयोजित करण्यात आली असून, १५०० पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले आहेत.

तरुण वयात पचन संस्थेच्या गंभीर आजारांमुळे व उशिरा होणाऱ्या निदानामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करणे, तसेच सामाजिक बांधिलकीतून जनसामान्यांचे जीवनमान उंचावणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले. पचन संस्थेतील जखमा व गाठींचे निदान बहुतांश वेळा शेवटच्या टप्प्यात होत असल्याने, प्राथमिक अवस्थेतच एण्डोस्कोपीद्वारे लवकर निदान व्हावे, यासाठी हा उपक्रम राबविला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

या शिबिरामध्ये डॉक्टरांची तपासणी फी, रक्त तपासणी तसेच तोंडाद्वारे एण्डोस्कोपी या सर्व सेवा पूर्णपणे मोफत देण्यात येत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande