
इगतपुरी, 26 जानेवारी (हिं.स.)इगतपुरी तालुक्यातील जुनवणे वाडी येथील एका गरोदर महिलेला रस्त्याअभावी रस्त्यातच आपला जीव गमवावा लागला होता. ती घटना ताजी असतानाच खैरेवाडी येथील एका व्यक्तीला रस्त्याअभावी आपला जीव गमवावा लागला. अजून शासन किती आदिवासी गरीबांचा बळी घेणार ? म्हणून एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने गरिबांच्या जीवाचा बळी घेणाऱ्या सरकारचा व व्यवस्थेचा जाहीर निषेध करून खैरेवाडी येथे रस्ता व्हावा या मागणीसाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊवान मधे यांच्या नेतृत्वाखाली महामार्गांवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आदिवासी बांधवांना त्यांचे मूलभूत हक्क व नागरी सुविधा मिळण्यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने अनेक आंदोलने अर्ज विनंती मोर्चे काढून शासनाचे लक्ष वेधले जाते. मात्र असंवेदनशील प्रशासन यंत्रणा व लोकप्रतिनिधी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात असा आरोप भगवान मधे यांनी केला. दरम्यान आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
चिंचलेखैरे ग्रामपंचायत पैकी खैरेवाडी या आदिवासी वस्तीला रस्ता नसल्याने नागरिकांना आपला जीव गमावावा लागत आहे. पावसाळ्यात नदी ओलांडून नागरिकांना शहराच्या ठिकाणी यावे लागते. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात घालून नदी ओलांडून यावे लागते. कोणी आजारी झाले किंवा महिलांना बाळंतपणासाठी तर डोली करून तीन किलोमीटर पेक्षा जास्त पायपीट करत जावे लागते. या वस्तीवर रस्ता व्हावा यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेने अनेक अर्ज विनंती करून या ठिकाणी रस्ता मंजूर करण्यात यावा अशी मागणी केली. त्यानंतर ह्या ठिकाणी रस्ता मंजूर करण्यात आला. त्याच्या भूमिपूजनाला एक वर्ष पूर्ण झाले मात्र प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाला अजूनही सुरुवात करण्यात आली नाही. एका वृद्ध व्यक्तीला रस्त्याअभावी वेळेत उपचार न मिळाल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला. हा शासकीय व्यवस्थेने घेतलेल्या बळी आहे. याचा एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. मृत्यूला कारणीभूत असलेल्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यावर व आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा. तात्काळ रस्त्याचे काम सुरू करावे अशा मागण्या करण्यात आल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV