
लातूर, 26 जानेवारी (हिं.स.)।
आपल्या देशाच्या इतिहासात २६ जानेवारी १९५० हा अत्यंत गौरवाचा दिवस आहे. या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले भारतीय संविधान अंमलात आले. आपला देश लोकशाही प्रजासत्ताक बनला. या संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांचा आदर करत आपण सर्वजण आपल्या भारत देशाला जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनविण्यासाठी कटीबद्ध होवुया, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे राष्ट्रध्वज वंदनेचा मुख्य शासकीय समारंभ झाला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांच्यासह स्वातंत्र्य सेनानी, त्यांचे कुटुंबीय, वीरमाता, वीरपत्नी, वीरपिता, माजी सैनिक, पत्रकार, नागरिक व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. भोसले म्हणाले, २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान अंमलात आले, आपला देश सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक बनला. जनतेच्या हातात सत्ता देणारे, प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची हमी देणारे आपले संविधान जगातील सर्वांत मोठे लिखित संविधान म्हणून ओळखले जाते. भारतीय संविधान हे केवळ कागदावरचे शब्द नाहीत, तर ते आपल्या सामूहिक आकांक्षांचे, स्वप्नांचे आणि मूल्यांचे दस्तऐवज असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय संविधानाने आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाची हमी दिली. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, धर्म आणि उपासना यांचे स्वातंत्र्य दिले. लिंग, जाती, धर्म, जन्मस्थान यांच्या आधारावर भेदभाव न करण्याची हमी दिली. आपला तिरंगा ध्वज हा स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे, शहीदांच्या रक्ताचे आणि संविधानाच्या मूल्यांचे प्रतीक आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला शिक्षण, आरोग्य, रोजगार, सुरक्षितता यांची हमी देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही पालकमंत्री श्री. भोसले यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिली.
पालकमंत्री श्री. भोसले यांनी यावेळी पोलीस परेडचे निरीक्षण केले. उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांनी पोलीस परेडचे नेतृत्व केले. पोलीस पथकांसह गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्र सेना, पोलीस बॅण्ड पथक, श्वान पथक, वज्र वाहन, बॉम्ब शोधक पथक, जलद प्रतिसाद पथक, रुग्णवाहिका, आपत्ती व्यवस्थापन कक्ष पाठक यासह विविध शासकीय विभागांचे १० चित्ररथ या पथसंचालनात सहभागी झाले होते.
*पाच हजार विद्यार्थ्यांची शिस्तबद्ध कवयात ठरली लक्षवेधी !*
प्रजासत्ताक दिनानिमित्त लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर गीतावर आधारित भव्य कवायत सादरीकरण केले. शिक्षण विभागामार्फत आयोजित या उपक्रमात शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis