जनार्दनपंत बोथे यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर
अमरावती, 26 जानेवारी (हिं.स.) देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेला पद्मश्री पुरस्कार अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे यांना जाहीर करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारच्या गृह मंत्रालया
जनार्दनपंत बोथे यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर


अमरावती, 26 जानेवारी (हिं.स.)

देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेला पद्मश्री पुरस्कार अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे यांना जाहीर करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने २०२६ सालच्या पद्म पुरस्कारांची यादी जाहीर केली असून, त्यात बोथे यांचा समावेश झाल्याने सामाजिक, आध्यात्मिक व सेवाभावी क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.पद्म पुरस्कार हे देशातील अत्यंत प्रतिष्ठेचे नागरी सन्मान असून, ते पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये प्रदान करण्यात येतात. कला, समाजकार्य, सार्वजनिक जीवन, विज्ञान व अभियांत्रिकी, व्यापार-उद्योग, वैद्यक, साहित्य-शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा आदी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी हे पुरस्कार दिले जातात. २०२६ सालासाठी राष्ट्रपतींनी एकूण १३१ पद्म पुरस्कारांना मंजुरी दिली आहे. श्री जनार्दनपंत बोथे यांनी सामाजिक, अध्यात्मिक व सेवाभावी कार्यातून समाजजागृती, मूल्यसंस्कार आणि मानवतेच्या सेवेचे कार्य सातत्याने केले आहे. त्यांच्या या प्रदीर्घ आणि निस्वार्थ सेवाभावी कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे पुरस्कार मार्च–एप्रिल २०२६ दरम्यान राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते भव्य समारंभात प्रदान करण्यात येणार आहेत. बोथे यांना जाहीर झालेल्या या राष्ट्रीय सन्मानाबद्दल गुरुदेव सेवा मंडळासह राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्याला मिळालेली ही मान्यता अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande