
लातूर, 28 जानेवारी (हिं.स.)।
प्रशासनावरील ज्यांची ‘वचक’, कामाचा ‘उरक’ पाहून अधिकारीही थक्क व्हायचे, असे संपूर्ण राज्याचे खंबीर नेतृत्व आज हरपले. अजित (दादा) पवार केवळ एका जिल्ह्याचे मर्यादित नेतृत्व नव्हते, तर ते राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजन मंत्री आणि अल्पसंख्याक विकास मंत्री म्हणून राज्याचा गाडा समर्थपणे हाकत. ते राज्याचे नेते होतेच, पण त्याही पलीकडे जाऊन मराठवाडा विभागावर त्यांचा विशेष लोभ होता. दादा मूळचे पश्चिम महाराष्ट्राचे, पण धाराशिव त्यांचे सासर. त्यामुळे मराठवाड्याचे 'जावई' म्हणून त्यांचा या भागावर जीव होताच, पण बीड जिल्ह्याचे 'पालकमंत्री' म्हणून त्यांनी जिल्ह्याला पितृवत प्रेम दिले.
गुरुद्वारातील ती 'अखेरची' भेट
अवघ्या दोन दिवसांपूर्वी, २५ जानेवारीला दादा मराठवाडा विभागाच्या दौऱ्यावर, नांदेडच्या पवित्र भूमीत होते. नांदेड येथील 'तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब' गुरुद्वारात ते नतमस्तक झाले. सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पवित्र गुरुद्वारात अत्यंत भक्तीभावाने दर्शन घेतले. 'कडा प्रसाद' ग्रहण केला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. दर्शन झाल्यानंतर ते गुरुद्वारा परिसरात थांबले. 'तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब'जीं चे दर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेऊन, बाहेर येईपर्यंत दादा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाट पाहत होते. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर सर्व मंत्री महोदय यांनी पवित्र गुरुद्वारातून एकत्रितपणे ऐतिहासिक 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शताब्दी समागम कार्यक्रमासाठी मोदी मैदानाकडे प्रस्थान केले. राज्याचे नेतृत्व म्हणून ज्येष्ठता आणि पदाचा मान राखण्याची त्यांची ही कृती सर्वांनाच भावली. गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ जी यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उपस्थित सर्व मान्यवरांचा यावेळी सन्मान केला.
पालकमंत्र्यांचा 'धडाका' आणि 'विश्वविक्रम'
एकीकडे नांदेडमध्ये ते अध्यात्मात रमले होते, तर दुसरीकडे बीडमध्ये त्यांनी विकासाचा विक्रम रचला होता. १ जानेवारी २०२६ ला वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी बीडमध्ये एकाच वेळी १३६३ विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करून प्रशासनालाही अवाक केले होते.
केवळ इमारती नाहीत, तर निसर्गाशी नाते जोडत त्यांच्याच उपस्थितीत बीडमध्ये एकाच दिवशी ३० लाखांहून अधिक वृक्ष लागवड करण्यात आली. याची नोंद 'वर्ल्ड रेकॉर्ड' (India Book of Records) मध्ये झाली. तरुणांवर त्यांचे विशेष प्रेम होते, म्हणूनच खेळाडूंसाठी क्रीडा विभागाचा २५ कोटींचा निधी मंजूर करून त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'टर्फ ग्राउंड' बीडकरांना दिले.
सहकार आणि अर्थाची जोड
प्रशासकीय शिस्तीचे भोक्ते असलेल्या दादांनी बीडमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या विभागाच्या भव्य 'सहकार संकुला'चे भूमिपूजन केले. सर्व सहकारी कार्यालये एकाच छताखाली असावीत, हा त्यांचा आग्रह होता. राज्याचे वित्त व नियोजन मंत्री या नात्याने त्यांनी बीडच्या विकासाला कधीच निधी कमी पडू दिला नाही. १७ सप्टेंबर २०२५ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अहिल्यानगर-बीड’ रेल्वेचे उद्घाटन झाले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी २ हजार कोटींपेक्षा जास्त निधी आणि ऐनवेळी दिलेले १५० कोटी रुपये, ही अर्थमंत्री म्हणून दादांनीच मंजूर केले होते.
काळजी घेणारे 'दादा'
बीड जिल्हा रुग्णालयात 'कार्डियाक कॅथलॅब' देऊन त्यांनी गोरगरिबांच्या हृदयाची सोय केली. दुर्दैवाने, बीडकरांच्या हृदयाची काळजी घेणाऱ्या पालकमंत्र्यांचे हृदय मात्र आज थांबले.
एकीकडे राज्याच्या अर्थव्यवस्थेचे सुकाणू समर्थपणे सांभाळणारे 'वित्त व नियोजन मंत्री' आणि दुसरीकडे बीडच्या प्रत्येक प्रश्नावर बारकाईने लक्ष घालणारे 'पालकमंत्री'... अशी दुहेरी भूमिका त्यांनी समर्थपणे पेलली. धाराशिवचे जावई आणि बीडचे पालक असलेल्या या विकासपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली!
- डॉ. श्याम टरके
सहायक संचालक (माहिती),
विभागीय माहिती कार्यालय, लातूर.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis