
लातूर, 28 जानेवारी (हिं.स.)।तुमच्या गाडीचा कट लागला आणि आमचा महागडा मोबाईल फुटला, असा बनाव करून सर्वसामान्य नागरिकांना लुटणाऱ्या एका सराईत टोळीचा विवेकानंद चौक पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मुख्य आरोपी वसीम रज्जाक शेख याला अटक करण्यात आली असून, त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
कारवाईचे मुख्य आकर्षण:
लुटमारीची 'मोडस ऑपरेंडी': विना नंबर प्लेटच्या दुचाकीवरून येऊन मुद्दाम कट मारणे, भांडण उकरून काढणे आणि दहशतीने सोन्याचे दागिने हिसकावणे.
मोठी वसुली: पोलिसांनी आरोपींकडून ४,६६,५५० रुपये किमतीचे ३४ ग्रॅम सोने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे.
गुन्ह्यांची मालिका:
या अटकेमुळे विवेकानंद चौक, एमआयडीसी आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यांतील एकूण ५ गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांची तत्परता:
पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील आणि त्यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने सापळा रचून या टोळीला बेड्या ठोकल्या. मुख्य आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर कडक कारवाई सुरू आहे.
नागरिकांसाठी आवाहन:
रस्त्यावर असा कोणताही संशयास्पद प्रकार घडल्यास किंवा कोणी विनाकारण भांडण उकरून काढत असल्यास तात्काळ '११२' नंबरवर कळवा किंवा जवळच्या पोलीस चौकीशी संपर्क साधा.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis