
परभणी, 29 जानेवारी (हिं.स.)।
महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर आता पक्षाचे गटनेते निवडण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. महापालिकेतील उद्धवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार अशा तिन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयात जाऊन ही निवडीची प्रक्रिया पूर्ण केली. महापालिकेत उद्धवसेनेच्या गटनेतेपदी दिलीपसिंह ठाकुर तर काँग्रेसच्या गटनेतेपदी गुलमीर खान आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारच्या गटनेतेपदी विजय जामकर यांची निवड करण्यात आली.
परभणी महापालिकेत उद्धव सेनेचे २५, काँग्रेसचे १२ तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारचे ११ सदस्य निवडून आले आहेत. पुढील काही दिवसात महापौरपदाची निवड प्रक्रिया जाहीर होऊ शकते. त्या अनुषंगाने मागील आठ दिवसात पक्ष स्तरावर प्रमुख नेत्यांच्या बैठका आणि नगरसेवकांची चर्चा करून गटनेते निश्चित करण्यात आले. तिन्ही पक्षाचे सर्व नगरसेवक, प्रमुख नेते, पदाधिकारी हे छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त यांच्याकडे गेले होते. तेथे सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत पक्षाच्या वतीने गटनेत्यांची केलेली निवड ही विभागीय आयुक्त यांच्यासमोर सादर करण्यात आली.
उद्धव सेनेकडून प्रभाग नऊ मध्ये निवडून आलेले दिलीपसिंह ठाकुर हे तर काँग्रेसकडून प्रभाग सातमधून निवडून आलेले गुलमीर खान आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारकडून प्रभाग १० मधून निवडून आलेले विजय जामकर यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
यापूर्वी महापालिकेत सदस्य म्हणून दिलीपसिंह ठाकूर यांनी आणि स्थायी समिती सभापती म्हणून गुलमीर खान तसेच विजय जामकर यांनी काम पाहिले आहे. भाजपने यापूर्वी तिरुमला खिल्लारे यांची गटनेतेपदी निवड केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis