नमुंमपा च्या वतीने मुख्यालयात अजित पवार यांना श्रध्दांजली अर्पण
नवी मुंबई, 29 जानेवारी, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दि. 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे विमान अपघातात आकस्मिक झालेल्या दु:खद निधनामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. ऐकल्यानंतर विश्वास बसणार नाही अशी सर्वांना नि:श
नवी मुंबई


नवी मुंबई, 29 जानेवारी, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दि. 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे विमान अपघातात आकस्मिक झालेल्या दु:खद निधनामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. ऐकल्यानंतर विश्वास बसणार नाही अशी सर्वांना नि:शब्द करुन टाकणारी ही दुर्दैवी घटना प्रत्येकाला सून्न करुन टाकणारी होती. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण करुन, अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार, सर्व विभागप्रमुख व अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागत नागरिक यांच्या उपस्थितीत स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनमोल योगदान असणा-या अजितदादा पवार यांच्यासारख्या महनीय नेतृत्वाच्या अचानक निधनामुळे महाराष्ट्राची व प्रशासनाची फार मोठी हानी झाली असल्याचे सांगत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो व त्यांच्या कुटूंबियांना या दु:खातून सावरण्याची शक्ती लाभो अशा शब्दात श्रध्दांजली अर्पण केली.

आयकॉनिक इमारत म्हणून ओळखल्या जाणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीच्या पायाभरणीपासून उभारणीपर्यंत तसेच महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांना गती देण्यात व अनेक प्रसंगात त्यांचे योगदान लाभले जे कधीही विसरता येणार नाही असे आयुक्त म्हणाले. मंत्रालय सेवेत असतांना त्यांच्या कामाची पध्दत जवळून पाहता आली. साता-यामध्ये काम करतांना त्यांचे मार्गदर्शन लाभले. कोव्हीड काळात पालघरचा जिल्हाधिकारी असतांना मोठया प्रमाणावर कामगार आपल्या गावी स्थलांतर करीत होते अशा वेळी आवश्यक प्रसंगी रात्री 2 वाजताही त्यांच्याशी बोलणे झाले व त्यांनी लगेच मदतही केली. सिडकोत असतांनाही त्यांचे विविध गोष्टींमध्ये मार्गदर्शन मिळाले अशा विविध ठिकाणच्या आठवणी आयुक्तांनी कथन केल्या.

दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह निधन झालेले त्यांचे सुरक्षारक्षक श्री. विदीप जाधव, पायलट कॅ. सुमित कपूर, कॅ. शांभवी पाठक, फ्लाईट अटेंडन्ट श्रीम. पिंकी माळी यांच्याही आत्म्यास चिरशांती लाभो अशी सामूहिक प्रार्थना करीत सर्वांनी स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande