
रायगड, 29 जानेवारी (हिं.स.)।जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराने कर्जत–खालापूर तालुक्यात राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि शिवसेना (उबाठा) उपजिल्हाध्यक्ष नितीन सावंत यांच्या एकत्रित हालचालींमुळे आमदार महेंद्र थोरवे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. नगर परिषद निवडणुकीतील पराभवानंतर पुन्हा एकदा घारे–सावंत जोडी सक्रिय झाल्याने थोरवेंच्या राजकीय गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा), शेतकरी कामगार पक्ष व मित्रपक्षांची परिवर्तन विकास आघाडी कर्जत–खालापूरमध्ये आक्रमक मोर्चेबांधणी करत आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेला रोखण्यासाठी आखलेली ही रणनीती प्रभावी ठरत असल्याचे चित्र असून, “कर्जतची सत्ता कोणाच्या हातात जाणार?” हा प्रश्न सध्या सर्वत्र चर्चेत आहे. प्रचारादरम्यान घारे यांचा वाढता जनसंपर्क आणि सावंत यांचे संघटन कौशल्य थोरवेंच्या अडचणी वाढवत असल्याचे दिसून येत आहे.
कर्जत नगर परिषद निवडणुकीत थोरवेंना पराभवाचा धक्का देणारी घारे–सावंत जोडी पुन्हा एकत्र आल्याने परिवर्तन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. प्रचार शिगेला पोहोचत असताना गावोगावी आघाडीचे झेंडे फडकत असून, “थोरवे विरुद्ध घारे” अशी थेट राजकीय लढत रंगू लागली आहे.
दरम्यान, बीड पंचायत समिती गणातून सुधाकर घारे यांच्या पत्नी नमिता घारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. घारे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या गणातून उमेदवारी जाहीर होताच विरोधकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, पंचायत समिती निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत.
रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष असलेल्या सुधाकर घारे यांचा ग्रामीण भागात मोठा प्रभाव आहे. वाडी-वस्त्यांपर्यंत पोहोचलेली संघटना, जिल्हा परिषदेतील प्रशासकीय अनुभव आणि परिवर्तन विकास आघाडीचे वाढते बळ यामुळे आमदार थोरवे यांच्यासमोरचे आव्हान आता केवळ राजकीय न राहता अस्तित्वाचे बनल्याची चर्चा कर्जत–खालापूरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके