
रायगड, 29 जानेवारी, (हिं.स.)। युवक कार्यकर्ते सागर शेळके यांनी कोणताही किंतु-परंतु न ठेवता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने आगामी काळात पक्ष संघटना त्यांना पूर्ण ताकद देईल, असा ठाम शब्द खासदार सुनील तटकरे यांनी दिला. कर्जतमधील मक्तेदारी हटवा आणि झुंडशाहीविरोधात एकजूट दाखवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
माणगाव तर्फे वरेडी जिल्हा परिषद गटातील युवक कार्यकर्ते सागर शेळके यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा डिकसळ येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर शेळके आणि त्यांच्या पत्नी मोनिका सागर शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते पुंडलिक पाटील, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, जिल्हा कार्याध्यक्ष अशोक भोपतराव, तालुकाध्यक्ष दीपक श्रीखंडे, नगरपरिषद उपनगराध्यक्ष संतोष पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते.
प्रास्ताविकात अशोक भोपतराव यांनी कर्जत शहरातील दडपशाहीविरोधात परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून लढा उभारण्याची गरज व्यक्त केली. सागर शेळके यांनी मनोगतात समाजकारण आणि राजकारणात पुन्हा सक्रिय होण्यासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
खासदार सुनील तटकरे यांनी भाषणात सांगितले की, कर्जत शहरात लोकशक्ती एकवटत असून धनशक्तीविरोधात जनतेने निवडणूक स्वतः हातात घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्ष एकत्र येऊन परिवर्तन घडवत आहेत. प्रशासकीय राजवटीत झालेल्या दडपशाहीच्या कामांचा आढावा घेतला जाईल. कर्जत तालुक्यात १८ विरुद्ध शून्य अशी स्थिती निर्माण करून मक्तेदारी संपवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कर्जतला सुसंस्कृत, निर्भीड नेतृत्वाची गरज असून जनतेने परिवर्तनाचा कौल द्यावा, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके