
रत्नागिरी, 29 जानेवारी, (हिं. स.) : फुणगूस (ता. संगमेश्वर) येथील येथील प्रसिद्ध हजरत शेख जाहीर शेख पीर दर्ग्याचा वार्षिक उर्स महोत्सव १ ते ४ फेब्रुवारी दरम्यान साजरा होणार आहे. सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र व गोवा राज्यात देखील नावलौकिक असलेला हजरत शेख जाहीर शेख पीर दर्गा संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस येथे शास्त्री खाडीकिनारी उभा आहे. सर्वांगसुंदर तितकाच आकर्षक असलेल्या या दर्ग्याचे काचेचे कोरीव काम भाविकांसह पर्यटकांनादेखील आकर्षित करते. नवसाला पावणारा जागरूक दर्गा म्हणूनही त्याची ओळख आहे. त्यामुळेच दरवर्षी येथे हजारो भाविक व पर्यटक येतात.
येथील वार्षिक उर्स इस्लामी कॅलेंडरनुसार शाबान महिन्याच्या १२ तारखेपासून सुरू होतो, तर उर्सचा मुख्य कार्यक्रम १४ शाबान रोजी साजरा केला जातो, त्याच दिवशी मुस्लिम बांधवांची शब-ए-बरात ही मोठी पवित्र रात्र असते. त्यामुळे या उर्स उत्सवाला एक वेगळे महत्त्व आहे. यावर्षी १ फेब्रुवारीपासून या उत्सवाला सुरुवात होत आहे. त्यादिवशी संध्याकाळी चुना मुबारकची मिरवणूक निघणार आहे. सोमवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी दुपारी दर्गा व्यवस्थापक नूरमुहंमद मुजावर व मुस्वविर मुजावर यांच्या निवसस्थानातून संदलची मिरवणूक निघेल. सोमवारी रात्री दर्गा पटांगणात नूराणी रातीबचा मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे. मंगळवार दिनांक ३ फेब्रुवारी रोजी उर्स मुबारक पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणार आहे. बुधवार, दि. ४ फेब्रुवारी रोजी नियाज (कंदोरी) ने चार दिवसीय उर्स मुबारक उत्सवाची सांगता होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी