रत्नागिरी : सुमारगड किल्ल्याच्या शिडीसाठी रविवारी श्रमदान
रत्नागिरी, 29 जानेवारी, (हिं. स.) : किल्ले सुमारगडवरील (ता. खेड) येथील कोसळलेली लोखंडी शिडी पुन्हा बसविण्यासाठी गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या रत्नागिरी विभागामार्फत येत्या रविवारी, दि. १ फेब्रुवारी रोजी श्रमदान मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमे
रत्नागिरी : सुमारगड किल्ल्याच्या शिडीसाठी रविवारी श्रमदान


रत्नागिरी, 29 जानेवारी, (हिं. स.) : किल्ले सुमारगडवरील (ता. खेड) येथील कोसळलेली लोखंडी शिडी पुन्हा बसविण्यासाठी गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या रत्नागिरी विभागामार्फत येत्या रविवारी, दि. १ फेब्रुवारी रोजी श्रमदान मोहीम राबविली जाणार आहे.

या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मावळ्यांनी ३१ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत किल्ले महिपतगड (वाडी बेलदार) पायथा येथे एकत्र जमायचे आहे. रात्री ८:३० वाजता सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात येईल. दुसऱ्या दिवशी म्हणजे १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता आवश्यक सर्व साहित्य घेऊन चढाईस सुरुवात होईल. शिडी बसवायची आहे त्या ठिकाणी साधारण ८ वाजण्याच्या सुमारास पोहोचल्यानंतर सर्वांचा नाश्ता होईल. सकाळी ९ वाजता शिडी बसविण्याच्या कामाला सुरुवात होईल.

सकाळी ९ ते दुपारी १.३० श्रमदान, १.३० ते २.३० जेवण, २.३० ते ३ विश्रांती, दुपारी ३ ते सायंकाळी ५ यावेळेत उर्वरित काम पूर्ण करणे, ५ ते ६ यावेळेत दुर्ग भ्रमंती आणि सायंकाळी ६ वाजता गड उतरण्यास सुरुवात होऊन ७ वाजता परतीचा प्रवास सुरू होईल.

या नियोजनानुसार ही संपूर्ण श्रमदान मोहीम शिस्तबद्ध पद्धतीने पार पडणार असून, सर्वांनी वेळेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande