पर्यटनस्थळे जगाच्या नकाशावर यावीत यासाठी स्पर्धेचे आयोजन - पुणे जिल्हाधिकारी
पुणे, 05 जानेवारी (हिं.स.)। जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आज ‘बजाज पुणे ग्रँड टूर- २०२६’ च्या टप्पा-१ च्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्र, मुळशी व मावळ तालुक्यातून जाणाऱ्या संपूर्ण स्पर्धा मार्गाची पाहणी केली. जिल्ह्यातील पर्यटनाची प्रचंड
Grant toprue


पुणे, 05 जानेवारी (हिं.स.)।

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आज ‘बजाज पुणे ग्रँड टूर- २०२६’ च्या टप्पा-१ च्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्र, मुळशी व मावळ तालुक्यातून जाणाऱ्या संपूर्ण स्पर्धा मार्गाची पाहणी केली. जिल्ह्यातील पर्यटनाची प्रचंड क्षमता असलेली ठिकाणे जगाच्या नकाशावर यावीत; त्या माध्यमातून येथील अर्थव्यवस्थेला चालना आणि स्थानिक तरुणांना त्याच ठिकाणी रोजगार मिळावा या उद्देशाने या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धामार्गावरील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी आमदार शंकर मांडेकर, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, पिंपरी चिंचवड शहर पोलीस वाहतूक शाखेचे उपायुक्त विवेक पाटील, प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, मुळशीचे तहसीलदार विजयकुमार चोबे, मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख आदी उपस्थित होते.

मुळशी तालुक्यातील कुळे येथे श्रीद्धा मंगल कार्यालय तसेच मावळ तालुक्यात शांताई गार्डन येथे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, मंडल अधिकारी, तलाठी, ग्राम विकास अधिकारी, पोलीस पाटील, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख आदींची बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

जिल्हाधिकारी श्री. डूडी यावेळी म्हणाले, ही आंतरराष्ट्रीय दर्जाची आणि ऑलिम्पिक पात्रतेची स्पर्धा असल्याने त्या दर्जाचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. त्यासाठी सुमारे ४०० कोटी रुपये मिळाले असून केवळ तीन महिन्यात ३५० कि.मी. रस्ते तयार करण्यात आले आहेत. यावर्षी सुमारे ५०० कि.मी. ची स्पर्धा होत असून दरवर्षी त्यात वाढ करत चार वर्षात १ हजार ५०० कि.मी. पर्यंत नेण्याचे उद्दीष्ट आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य, पर्यटनस्थळे, शिवकालीन इतिहास जगभर पोहोचविण्याची संधी आहे. मार्गाचे मोठ्या क्रीडा वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण होणार असल्याने मार्गावर स्वच्छता ठेवावी, मार्गावर पाळीव प्राणी येऊ देऊ नयेत.

ही स्पर्धा फक्त महाराष्ट्राची नव्हे तर देशाची सर्वात मोठी स्पर्धा असणार आहे. पावणेदोनशेच्या वर स्पर्धक भाग देणार आहेत. मुळशी, मावळ, भोर, राजगड येथे स्पर्धेचा मार्ग असणार आहे. त्यामुळे येथील इतिहास पुढे येणार आहे. येथील नागरिक स्पर्धेसाठी उत्साहाने मदत करत आहेत. भारतीय आणि येथील नागरिकांचे नाव त्यांच्या कायम आठवणीत राहील असे चांगले स्वागत व आदरतिथ्य करावे. स्पर्धेवेळी येथील ग्रामस्थानी, नागरिकांनी स्पर्धेच्या मार्गावर बाजूला उभे राहून खेळाडूंचा उत्साह वाढवावा. सर्वांनी एकत्रित होऊन मोठे काम होऊ शकते हे दाखवून देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार श्री. मांडेकर म्हणाले, ही स्पर्धा जागतिक असून अभिमानास्पद बाब आहे. प्रशासनाने मोठ्या निधीची तरतूद केली. यामुळे येथील रस्ते खूप उत्कृष्ट झाले आहेत. येथे अनेक पर्यटन स्थळे असून सर्वांसमोर येतील. या भागाची वेगळी ओळख जगाच्या पातळीवर होईल. जगात एक चांगला संदेश जाण्यासाठी अभियान पातळीवर नागरिकांनी स्पर्धा मार्गावरील स्वच्छता ठेवावी. यासाठी जनजागृती करण्यात येईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande