
छत्रपती संभाजीनगर, 07 जानेवारी (हिं.स.) : भूमी अभिलेख विभागाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरात हाती घेण्यात आलेल्या डिजिटल नकाशा (नॅशनल जीओ स्पेशिअल नॉलेज बेसड लँड सर्व्हे ऑफ अर्बन हॅबिटेशन) प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
या प्रकल्पांतर्गत शहरातील मालमत्तांची ड्रोनद्वारे मोजणी करून क्षेत्रफळ निश्चित करण्यात आले आहे. येत्या 26 जानेवारीपर्यंत जवळपास 10,000 नागरिकांना डिजिटल मालमत्ता पत्रक (पीआर कार्ड) वाटप करण्याचे नियोजन आहे.
डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडिफिकेशन (डीआयएलआरएमपी) योजनेअंतर्गत जुने भूमी अभिलेख डिजिटल स्वरूपात रूपांतरित करून सर्व सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 700 पेक्षा अधिक गावठाणांचे सर्वेक्षण केले गेले असून एक लाख 15 हजार नागरिकांना पीआर कार्ड वितरित करण्यात आले आहेत. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हा पायलट प्रकल्प यशस्वी ठरल्यामुळे तो राज्यभर राबविण्यात आला आहे.
कन्नड शहरातील घरांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून जीओ टॅगिंग नकाशे तयार करण्यात आले आहेत. नागरिकांना नोटिस बजावून मालमत्तेचे दस्तऐवज मागवून त्यावरील क्षेत्रफळाची जागेवर तपासणी करून नकाशा तयार केला गेला आहे. या प्रकल्पामुळे शासनाला प्रत्येक मालमत्तेची संपूर्ण नोंद मिळाली असून मालमत्ताधारक, क्षेत्रफळ आणि हद्दीची माहिती डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवली गेली आहे.भूमी अभिलेख विभागाने सांगितले की, प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण असून नागरिकांना मालमत्ता पत्रकाचे वाटप 26 जानेवारीला करण्यात येईल.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis