मोर्शी : वीज समस्यांवर शेतकरी आणि महावितरणची बैठक
मोर्शी, 05 जानेवारी (हिं.स.) : मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना सतत होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी 5 जानेवारी रोजी तहसील कार्यालय मोर्शीत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेण्यात आली. ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालु
मोर्शी  येथे वीज समस्यांवर शेतकरी आणि महावितरणची बैठक


मोर्शी, 05 जानेवारी (हिं.स.) : मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना सतत होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी 5 जानेवारी रोजी तहसील कार्यालय मोर्शीत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेण्यात आली. ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती. बैठकीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी रवींद्र पवार होते.

बैठकीत शेतकऱ्यांनी ग्रामीण भागातील शेती पंपांसाठी सातत्याने बदलणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत आपली तक्रार मांडली. सध्या बारा महिन्यात बारा नवीन वेळापत्रक जाहीर केले जात असून, दिवसातून केवळ आठ तास वीज पुरवठा केला जात आहे. मात्र, विजेचा पुरवठा अनेकदा दिवसा व रात्री अशा अनियमित वेळात होत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो.रुपेश वाळके यांनी बैठकीत मागणी केली की, रात्रीचा वीजपुरवठा थांबवून दिवसा शेतकऱ्यांना नियमित आणि पुरेशा दाबाने वीजपुरवठा सुनिश्चित केला जावा. शेतकऱ्यांच्या सांगण्यानुसार सध्या बारा तासांच्या ठराविक वेळापत्रकातून बहुतेक ठिकाणी फक्त चार ते पाच तास विजेचा पुरवठा होत आहे. यामुळे संत्रा उत्पादनासह हजारो हेक्टर क्षेत्रावरील शेतीवर परिणाम होत आहे.महावितरण कंपनीतर्फे कार्यकारी अभियंता यांनी वेळापत्रकात बदल करून दिवसा वीजपुरवठा करणे शक्य नसल्याचे सांगितले. यावरून शेतकऱ्यांनी ८ दिवसांच्या आत दिवसा वीजपुरवठा न मिळाल्यास महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला.बैठकीत उपविभागीय अधिकारी रवींद्र पवार, कार्यकारी अभियंता कासट, उप कार्यकारी अभियंता उमाळे, तहसीलदार सागर ढवळे, वन परिक्षेत्र अधिकारी चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रफुल भोजने, तसेच अनेक स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande