
रायगड, 05 जानेवारी (हिं.स.)।
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची रायगड जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान गतीने पुढे जात आहे. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधणे, ग्रामपंचायतींची प्रशासनिक क्षमता वाढवणे आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
या अभियानांतर्गत विशेष पथकाने रायगड जिल्ह्यातील अलिबाग, माणगाव, रोहा, पेण, उरण, पनवेल, मुरूड, कर्जत, महाड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, पोलादपूर, खालापूर आणि सुधागड या तालुक्यांतील विविध ग्रामपंचायतींना भेटी दिल्या. या भेटीदरम्यान ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेण्यात आला तसेच ग्रामस्थांच्या समस्या, गरजा आणि उपलब्ध सुविधांची माहिती घेण्यात आली.
अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमा, कचरा व्यवस्थापन, शुद्ध पाणीपुरवठा, सीसीटीव्ही यंत्रणा, डिजिटल प्रशासन, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि स्वयंरोजगाराला चालना देणारे उपक्रम राबविण्यात येत आहेत. ग्रामसभांमधून नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर विशेष भर देण्यात येत असून, स्थानिक महसूल वाढवण्यासाठीही उपाययोजना केल्या जात आहेत.
या अभियानाला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ग्रामपंचायती अधिक सक्रिय व जबाबदार बनताना दिसत आहेत. अभियानामुळे ग्रामीण भागात पारदर्शक, उत्तरदायी आणि लोकाभिमुख प्रशासन उभे राहत आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी सांगितले की, या अभियानाला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, सर्व ग्रामपंचायतींनी एकत्रित प्रयत्न केल्यास रायगड जिल्हा राज्यात आदर्श ठरू शकतो. ग्रामीण विकासाच्या दिशेने रायगड जिल्हा ठोस पावले टाकत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके