
पुणे, 05 जानेवारी (हिं.स.)।मेट्रोचा प्रवास पुणे व पिंपरी-चिंचवडकरांना भावतोय. त्यामुळे दररोज दीड ते दोन लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करतात. प्रवाशांची गैरसुविधा होऊ नये म्हणून सर्व मेट्रो स्थानकांवर लाखों रुपये खर्च करून स्वयंचलित तिकीट मशिन बसविण्यात आले आहे; मात्र अनेकदा या मशिन बिघाडामुळे कागदी तिकीट मिळण्यास अडथळा निर्माण होत असल्याने, मेट्रो प्रशासनाने कागदी तिकिटाला कात्री लावण्याचे ठरवले असून, मोबाईल, व्हॉट्स ॲप अथवा ॲपवररून डिजिटल तिकीट घेण्याविषयी प्रवाशांना सांगितले जात आहे.
कागदी तिकिटे बंद करून पूर्णपणे डिजिटल तिकीट प्रणालीकडे वळण्याचा निर्णय मेट्रोने घेतला आहे. मेट्रोच्या या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, काही प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
मेट्रो प्रशासनाने ‘व्हॉट्ॲप तिकीट’, ‘मेट्रो स्मार्ट कार्ड’ आणि ‘मोबाईल ॲप’ यांसारख्या पर्यायांना प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. कागदाचा वापर कमी करून पर्यावरणपूरक पाऊल उचलणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु