
नागपूर, 5 जानेवारी (हिं.स.) :सर्वसामान्य ग्राहक व शेतकऱ्यांना करारातील अटी सहज समजाव्यात यासाठी राज्यातील बिल्डर, डेव्हलपर्स तसेच सर्व बँकांनी प्लॉट-फ्लॅटचे विक्रीपत्र, विक्री करारनामा आणि कर्जविषयक सर्व करार मराठी भाषेतूनच करावेत, अशी ठाम मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गजानन पांडे यांनी केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार सर्व शासकीय व निमशासकीय व्यवहार मराठी भाषेतून करणे बंधनकारक असतानाही प्रत्यक्षात प्लॉट व फ्लॅट खरेदी करताना बिल्डर-डेव्हलपर्स तसेच बँका करारनामे इंग्रजी भाषेतूनच करतात, ही बाब नियमबाह्य असल्याचे श्री. पांडे यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, सर्वसामान्य ग्राहक व शेतकऱ्यांना क्लिष्ट इंग्रजी भाषा समजत नसल्याने अनेकदा करारातील अटी नीट वाचल्या जात नाहीत आणि केवळ सह्या केल्या जातात. परिणामी तोंडी दिलेली आश्वासने करारनाम्यात नमूद नसल्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते.अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या प्रयत्नांमुळे जिल्हा व राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगातील सर्व निर्णय मराठी भाषेतून दिले जातात, हेही यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. मात्र प्लॉट-फ्लॅट खरेदीवेळी एजंट किंवा कर्मचारी तोंडी प्रलोभने देतात आणि प्रत्यक्ष करारनाम्यात त्या अटी नमूद केल्या जात नाहीत, ही गंभीर बाब असल्याचे संघटनेने सांगितले.
याशिवाय बँकेतून कर्ज घेताना किंवा तारण ठेवताना होणारे करारही इंग्रजीत असल्यामुळे ग्राहक व शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता अधिक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.त्यामुळे सर्व बिल्डर, डेव्हलपर्स आणि बँकांनी नियमाप्रमाणे मराठी भाषेतूनच विक्री करारनामा, विक्रीपत्र व कर्जविषयक करार करावेत. नियमांचा भंग झाल्यास संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी गजानन पांडे यांच्यासह ॲड. स्मिता देशपांडे, कोषाध्यक्ष संजय धर्माधिकारी आणि नागपूर जिल्हाध्यक्ष गणेश शिरोळे यांनी केली आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis