
लातूर, 08 जानेवारी (हिं.स.)। रेणापूर तालुक्यातील मौजे खरोळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या भव्य सभागृह बांधकामाचा शुभारंभ भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश रमेश कराड यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. पर्यटन विकास योजनेअंतर्गत आमदार रमेश कराड यांच्या विशेष प्रयत्नातून या कामासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
याप्रसंगी बोलताना ऋषिकेश कराड म्हणाले की, 'लातूर ग्रामीण मतदारसंघातील धार्मिक स्थळांचा विकास आणि मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी आमदार रमेश कराड यांच्यामाध्यमातून कोट्यवधींचा निधी आणला जात आहे. खरोळा येथील सभागृहाचे काम दर्जेदार व्हावे, यासाठी १० लाखांचा निधी कमी पडल्यास आणखी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल.
या कार्यक्रमास भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ भोसले, मंडल अध्यक्ष महेंद्र गोडभरले, रमाकांत फुलारी, विश्वनाथ हेने, हणमंत राऊतराव, मोहन राऊतराव, अनिता राऊतराव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभागृहामुळे गावातील धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची मोठी सोय होणार असल्याने खरोळा ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
---------------
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis