
बीड, ०९ जानेवारी (हिं.स.) : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी आज बीड येथील विशेष मकोका न्यायालयात पार पडली. या सुनावणीत सरकारी पक्षाने कागदपत्रांवर आधारित पुराव्यांचा सविस्तर आढावा न्यायालयासमोर सादर केला.
सरकारी पक्षाच्या पुराव्यांच्या यादीवर आता आरोपी पक्षाला आपले म्हणणे मांडायचे असून, न्यायालयाने त्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तसेच या प्रकरणातील महत्त्वाचे डिजिटल पुरावे असलेले पेन ड्राईव्ह सर्व आरोपींना उपलब्ध करून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
दरम्यान, या खटल्यातील काही आरोपींनी आपले वकील बदलण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी आपले लेखी म्हणणे सादर करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले. तसेच या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या विष्णू चाटे याने कारागृह बदलून मिळावे, यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर २०१४ रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात वाल्मीक कराडसह इतर आरोपी सध्या अटकेत असून ते बीड कारागृहात आहेत. प्रकरणाची सुनावणी सध्या सुरू असून, पुढील सुनावणी २३ जानेवारी रोजी होणार आहे.
या सुनावणीदरम्यान पुराव्यांच्या पारदर्शकतेसाठी आरोपी पक्षाकडून डिजिटल पुरावे (पेन ड्राईव्ह) उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती, त्यास न्यायालयाने मान्यता दिली.
------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis