
सिरमौर, 09 जानेवारी (हिं.स.) : हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील हरिपुरधार परिसरात शुक्रवारी एक अत्यंत दुर्दैवी रस्ता अपघात झाला. कुपवीहून शिमलाकडे जाणारी खासगी प्रवासी बस चालकाचा ताबा सुटल्याने सुमारे 50 मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे 35 प्रवासी होते. अपघात इतका भीषण होता की बसचे पूर्णपणे तुकडे झाले आणि घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना दरीतून बाहेर काढत रस्त्यापर्यंत पोहोचवले. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, प्रशासन आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आणि युद्धपातळीवर बचाव कार्य राबवण्यात आले. गंभीर जखमी प्रवाशांना उपचारासाठी हायर संगडाह, ददाहू, नाहन आणि नाहन मेडिकल कॉलेज येथे पाठवण्यात आले आहे. अपघातानंतर बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे सिरमौरचे पोलीस अधीक्षक निश्चित सिंह नेगी यांनी सांगितले. दरम्यान, उद्योग मंत्री हर्षवर्धन चौहान यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून जखमींना उत्तम उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री सुखविंद्र सिंह सुक्खू यांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत आणि जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा देण्याचे आदेश दिले आहेत.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी