

नवी दिल्ली, 09 जानेवारी (हिं.स.)। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी) राष्ट्रीय आयईडी डेटा व्यवस्थापन प्रणालीचे (एनआयडीएमएस) दूरदृश्य प्रणाली द्वारे उद्घाटन केले.
कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सहा वर्षांत विविध प्रकारचा डेटा तयार करण्याचे आणि त्याचे पद्धतशीरपणे संकलन करण्याचे महत्वाचे काम झाले आहे. ते म्हणाले की, देशात घडणाऱ्या सर्व प्रकारच्या दहशतवादी घटनांच्या तपासासाठी आणि त्यांच्या विविध पैलूंचे विश्लेषण करण्यासाठी येत्या काळात एनआयडीएमएस अत्यंत महत्त्वाचे ठरेल. तसेच, एनआयडीएमएस हे पुढील पिढीचे दहशतवादाविरोधातील सुरक्षा कवच बनेल.
शाह म्हणाले की, गृह मंत्रालयाने गेल्या काही वर्षांत विविध प्रकारचा डेटा तयार केला आहे, मात्र तो स्वतंत्र कप्या-कप्यात असून एकमेकांपासून वेगळा आहे. आता, आम्ही या सर्व डेटा स्त्रोतांना एकमेकांशी जोडण्याचा, आणि त्याच्या विश्लेषणासाठी एक प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सॉफ्टवेअर विकसित करण्याचा प्रयत्न करत आहोत. ते म्हणाले की, आज सुरु करण्यात आलेल्या एनआयडीएमएसमुळे या प्रक्रियेला गती मिळेल आणि देशाला दहशतवादापासून सुरक्षित बनवण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.
अमित शाह म्हणाले की, आज सुरू होत असलेल्या एनआयडीएमएसमुळे राष्ट्रीय तपास यंत्रणा, देशभरातील दहशतवाद विरोधी पथके, राज्य पोलीस दल आणि सर्व केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांना (सीएपीएफ) द्वि-मार्गी, सर्वसमावेशक, एकात्मिक आणि ऑनलाइन डेटा मंच उपलब्ध होईल. ते म्हणाले की, कोणत्याही ठिकाणी, स्फोट अथवा आयईडी स्फोट यासारख्या घटनांशी संबंधित डेटा या प्रणालीमध्ये समाविष्ट करता येईल. या डेटाचा वापर करून प्रत्येक राज्यात तपासादरम्यान आवश्यक मार्गदर्शन मिळवता येईल. दहशतवादी कारवायांचा तपास करण्यासाठी, स्फोटांमागचे समान सूत्र समजून घेण्यासाठी आणि त्या विरोधात प्रभावी रणनीती आखण्यासाठी एनआयडीएमएस अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असे त्यांनी सांगितले.
गृहमंत्र्यांनी सांगितले की, 'एक राष्ट्र, एक माहिती भांडार' च्या माध्यमातून विविध विभागांमध्ये विखुरलेला डेटा आता प्रत्येक पोलीस विभागाला राष्ट्रीय संपत्ती म्हणून उपलब्ध होईल. यामुळे खटल्याची गती आणि गुणवत्ता दोन्हीमध्ये सकारात्मक बदल होईल आणि आपल्याला गुन्ह्या मागचे समान सूत्र सहजपणे ओळखता येईल. ते म्हणाले की गुन्ह्याचे स्वरूप समजून घेतल्यावर वैज्ञानिक पुराव्यावर आधारित खटला चालवणे शक्य होईल.
अमित शाह म्हणाले की, एनएसजी हा आपल्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा भक्कम आधारस्तंभ आहे. एनएसजी जवानांचे शौर्य, अद्वितीय कौशल्य आणि अतूट समर्पणामुळे देशाच्या नागरिक निश्चिंत राहतात. एनएसजी हे भारताचे जागतिक दर्जाचे आणि शून्य-त्रुटी असलेले दल आहे.
अमित शाह म्हणाले की, गेल्या चार दशकांमध्ये सुरक्षेच्या सतत बदलत असलेल्या परिप्रेक्ष्यात एनएसजीने स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणण्याची प्रक्रिया सुरू ठेवली आहे. एनएसजीची प्रादेशिक केंद्रे आता मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद आणि अहमदाबाद या देशातील विविध भागांमधून काम करतील. याशिवाय, अयोध्येत देखील एक नवे केंद्र उभारले जात आहे.
पुढे ते म्हणाले की, देशातील जवळजवळ 100 टक्के, म्हणजे सुमारे 17,741 पोलीस ठाणी सीसीटीएनएसशी जोडलेली आहेत, त्यामुळे त्यांचा ऑनलाइन डेटा उपलब्ध होतो. 'एक डेटा-एक नोंद' या संकल्पनेवर आधारित आयसीजेएस-2 ही पुढील पिढीतील डेटा-शेअरिंग प्रणाली म्हणून उदयाला येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule