आयआयटी मुंबईमध्ये 'परम रुद्र' सुपरकॉम्प्युटरचे उद्घाटन
मुंबई, 09 जानेवारी (हिं.स.)। भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे (डीएसटी) सचिव प्रा. अभय करंदीकर यांच्या हस्ते भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई येथे अत्याधुनिक सुपरकॉम्प्युटिंग सुविधा ''परम रुद्र'' चे उद्घाटन झाले. 3 पेटाफ्लॉप्
Param Rudra supercomputer IIT Mumbai


IIT Mumbai


मुंबई, 09 जानेवारी (हिं.स.)। भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे (डीएसटी) सचिव प्रा. अभय करंदीकर यांच्या हस्ते भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई येथे अत्याधुनिक सुपरकॉम्प्युटिंग सुविधा 'परम रुद्र' चे उद्घाटन झाले.

3 पेटाफ्लॉप्सची ही उच्च कार्यक्षमता संगणक प्रणाली (एचपीसी) राष्ट्रीय सुपरकंप्युटिंग मिशनच्या (एन एस एम) 'बिल्ड अप्रोच' अंतर्गत विकसित आणि कार्यान्वित करण्यात आली आहे. 'परम रुद्र' ही प्रणाली स्वदेशी बनावटीच्या 'रुद्र' सर्व्हरवर आधारित आहे, जे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सी-डॅक) द्वारे विकसित केले गेले आहेत आणि भारतातच उत्पादित केले जातात, यामुळे भारत सरकारच्या 'मेक इन इंडिया' उपक्रमाला बळकटी मिळते. ही प्रणाली सी-डॅकच्या स्वदेशी सॉफ्टवेअर स्टॅकद्वारे समर्थित आहे आणि त्यात प्रगत डायरेक्ट कॉन्टॅक्ट लिक्विड कूलिंग (डीसीएलसी) तंत्रज्ञानाचा समावेश आहे, ज्यामुळे सुधारित कार्यक्षमता आणि ऊर्जा कार्यक्षमतेत वाढ होते.

उपस्थितांना संबोधित करताना, भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे (डीएसटी) सचिव, प्रा. अभय करंदीकर यांनी सांगितले की, 'परम रुद्र' सुविधा आयआयटी मुंबईमधील संगणकीय संशोधन क्षमतांना लक्षणीयरीत्या बळकट करेल, यामुळे देशभरातील संशोधकांव्यतिरिक्त 200 हून अधिक प्राध्यापक आणि सुमारे 1,200 विद्यार्थ्यांना फायदा होईल. त्यांनी नमूद केले की ही सुविधा कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवतंत्रज्ञान आणि प्रगत उत्पादन यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये नवोन्मेषाला चालना देईल, तसेच स्टार्टअप्स आणि उद्योग-केंद्रित संशोधनालाही पाठिंबा देईल.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) गट समन्वयक सुनीता वर्मा यांनी यावर जोर दिला की, रुद्र-आधारित समूह हा भारताच्या स्वदेशी सुपरकंप्युटिंग प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारताची क्षमता एक्झास्केल कम्प्युटिंगच्या दिशेने पुढे नेण्यासाठी एचपीसी सिस्टीम, सॉफ्टवेअर, मायक्रोप्रोसेसर आणि नेटवर्किंग तंत्रज्ञानामध्ये सातत्यपूर्ण गुंतवणुकीच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.

राष्ट्रीय सुपरकंप्युटिंग मिशनचे मिशन संचालक डॉ. हेमंत दरबारी यांनी सांगितले की, 'परम रुद्र' कार्यान्वित झाल्यामुळे एनएसएम अंतर्गत देशभरात एकूण 44 पेटाफ्लॉप्स क्षमतेचे 38 सुपरकॉम्प्युटर आतापर्यंत स्थापित करण्यात आले आहेत. त्यांनी पुढे नमूद केले की, आयआयटी मुंबई येथील 'परम रुद्र' सुविधा मुंबई आणि आसपासच्या अनेक संस्थांसाठी संशोधनाच्या संधी वाढवेल आणि वर्धित सहकार्य व वैज्ञानिक निष्कर्षांना चालना देईल.

राष्ट्रीय सुपरकंप्युटिंग मिशनचे संचालन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) यांच्या संयुक्त विद्यमाने केले जाते, आणि सी-डॅक व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स , बंगळूरू या अंमलबजावणी करणाऱ्या संस्था म्हणून काम करतात. हे अभियान सुपरकंप्युटिंग पायाभूत सुविधा, ॲप्लिकेशन्स विकास, संशोधन आणि विकास, आणि मनुष्यबळ विकास या चार प्रमुख स्तंभांद्वारे एक सर्वसमावेशक स्वदेशी सुपरकंप्युटिंग परिसंस्था निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande