
गुगल प्ले स्टोअर लवकरच ''ट्राय बिफोर यू बाय'' फीचर आणू शकते
मुंबई, 09 जानेवारी (हिं.स.)। गुगल प्ले स्टोअरवर गेम खेळणाऱ्या आणि पेड गेम्स खरेदी करणाऱ्या युजर्ससाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गुगल लवकरच “ट्राय बिफोर यू बाय ” नावाचे नवे फीचर आणण्याच्या तयारीत असून या फीचरमुळे प्ले स्टोअरवरील गेमिंगचा अनुभव मोठ्या प्रमाणात बदलू शकतो. या सुविधेमुळे कोणताही पेड गेम खरेदी करण्यापूर्वी ठराविक कालावधीसाठी तो मोफत ट्रायल म्हणून खेळण्याची संधी युजर्सना मिळणार आहे. काही मिनिटांपासून ते काही तासांपर्यंत हा ट्रायल कालावधी असू शकतो. ट्रायल दरम्यान गेम आवडल्यास त्याच गेमची खरेदी करण्याचा पर्याय देखील उपलब्ध असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ट्रायलमध्ये केलेली प्रोग्रेस गेम खरेदी केल्यानंतरही जतन राहील, त्यामुळे पुन्हा सुरुवातीपासून गेम सुरू करण्याची गरज भासणार नाही.
अँड्रॉइड ऑथोरिटीच्या अहवालानुसार, अलीकडील APK टियरडाउनमध्ये या फीचरचे अनेक संदर्भ आढळले आहेत, त्यामुळे गुगल या सुविधेवर गंभीरपणे काम करत असल्याचे संकेत मिळतात. सुरुवातीला ही सुविधा केवळ पेड गेम्ससाठी उपलब्ध होण्याची शक्यता असून एका गेमसाठी फक्त एकदाच मोफत ट्रायलची संधी दिली जाईल. पुन्हा ट्रायल घेण्याचा प्रयत्न केला तर “You already used the trial” असा संदेश दिसू शकतो. त्यामुळे सिस्टिमचा गैरवापर टळेल आणि डेवलपर्सनाही योग्य युजर्सपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. या फीचरचा वापर पूर्णपणे डेवलपर्सच्या निर्णयावर अवलंबून असेल, म्हणजे ज्या डेवलपर्सना हवे असेल तेच आपल्या गेमसाठी हा पर्याय सुरू करू शकतील. यामुळे गेमची गुणवत्ता दाखवण्याची त्यांना उत्तम संधी मिळेल, तर युजर्सना पैसे खर्च करण्यापूर्वी गेमचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा विश्वास मिळणार आहे.
भविष्यात ही सुविधा केवळ गेम्सपुरती मर्यादित न राहता नॉन-गेम अॅप्सपर्यंतही वाढवली जाऊ शकते, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. याचबरोबर गुगल प्ले स्टोअरमध्ये यावर्षी आणखी मोठे बदल होणार असून 1 मार्च 2026 पासून जास्त बॅटरी ड्रेन करणाऱ्या अॅप्सवर स्पष्ट चेतावणी दाखवली जाईल आणि अशा अॅप्सना प्ले स्टोअरच्या रिकमेंडेशन लिस्टमधून हटवले जाईल. यामुळे सुरक्षित आणि युजर-फ्रेंडली अॅप्सना प्रोत्साहन मिळेल तसेच युजर्सचा अनुभव अधिक दर्जेदार होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule