
मुंबई, 09 जानेवारी (हिं.स.)। चॅटजीपीटी बनवणाऱ्या ओपनएआय कंपनीने ‘चॅटजीपीटी हेल्थ’ नावाचे नवे फीचर सादर केले आहे. या खास एआय सुविधेमुळे वापरकर्ते आपले मेडिकल रेकॉर्ड आणि वेलनेस अॅप्स सुरक्षितपणे चॅटजीपीटीशी जोडू शकतील. त्यामुळे आरोग्यविषयक निर्णय अधिक माहितीच्या आधारे आणि आत्मविश्वासाने घेण्यास मदत होईल, असे कंपनीचे मत आहे.
ओपनएआय मधील एप्लिकेशनची सीईओ फिदजी सिमो यांनी सांगितले की चॅटजीपीटी हेल्थ हे चॅटजीपीटीला वैयक्तिक सुपर-असिस्टंट बनवण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे. लोकांच्या आयुष्यातील विविध क्षेत्रांमध्ये योग्य माहिती आणि आवश्यक साधने देऊन त्यांच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यात ही सुविधा मदत करेल, असे त्यांनी नमूद केले. सिमो यांचे म्हणणे आहे की सध्याची आरोग्यव्यवस्था रुग्ण आणि डॉक्टर दोघांसाठीही पूर्णपणे परिणामकारक ठरत नाही आणि त्यामुळे दोन्ही घटक आता एआय साधनांकडे वेगाने वळत आहेत.
ओपनएआयने दिलेल्या माहितीनुसार 2023 ते 2024 दरम्यान डॉक्टरांकडून एआयचा वापर जवळजवळ दुपटीने वाढला आहे आणि सुमारे 68 टक्के डॉक्टरांना एआय मुळे रुग्णसेवा अधिक चांगल्या पद्धतीने देता येते असे वाटते. ओपनएआयच्या सर्वेक्षणातही अमेरिकेतील पाचपैकी तीन प्रौढांनी अलीकडच्या महिन्यांत हेल्थ किंवा हेल्थकेअरशी संबंधित कामांसाठी एआय टूल्सचा वापर केल्याचे सांगितले असून त्यापैकी 75 टक्के लोकांना हा अनुभव उपयुक्त वाटला.
आधीपासूनच लाखो लोक दर आठवड्याला चॅटजीपीटी कडे आरोग्य आणि वेलनेसविषयक प्रश्न विचारत आहेत आणि त्याच गरज लक्षात घेऊन चॅटजीपीटी हेल्थ विकसित करण्यात आले आहे. या फीचरमध्ये खासगीपणा आणि सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य दिले असून हेल्थविषयक संभाषणांसाठी चॅटजीपीटी मध्ये स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे, जिथे फाइल्स, चॅट्स आणि जोडलेले अॅप्स इतर संभाषणांपासून पूर्णपणे वेगळे ठेवले जातील. ओपनएआयने स्पष्ट केले आहे की या डेटाचा वापर एआय मॉडेल्स ट्रेन करण्यासाठी केला जाणार नाही.
वापरकर्ते इच्छेनुसार आपल्या मेडिकल रेकॉर्ड्स आणि वेलनेस अॅप्स जोडू शकतात, त्यामुळे त्यांना आणखी वैयक्तिकृत आणि उपयुक्त माहिती मिळू शकते. मात्रचॅटजीपीटी हेल्थ हा आजार ओळखण्याचा किंवा उपचाराचा पर्याय नाही आणि डॉक्टरांच्या सल्ल्याची जागा घेणार नाही, हेही कंपनीने स्पष्ट केले. या फीचरचे उद्दिष्ट दैनंदिन प्रश्न समजून घेणे आणि आरोग्याशी संबंधित निर्णयांमध्ये मदत करणे एवढेच आहे. ओपनएआयने डिजिटल हेल्थ प्लॅटफॉर्म b.well सोबत भागीदारी केली असून त्यामुळे वापरकर्ते आपला आरोग्य डेटा स्वतः नियंत्रित करू शकतील. सध्या या फीचरकरिता वेटलिस्ट ठेवण्यात आली आहे आणि मेडिकल रेकॉर्ड जोडण्याची सुविधा सध्या अमेरिकेत मर्यादित आहे. पुढील काळात हा फीचर हळूहळू इतर देशांमध्येही उपलब्ध करून देण्याची माहिती कंपनीने दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule