
गोर बंजारा समाज व गोरसेनेचे आंदोलन
शासनाला तातडीने निर्णय घेण्याची मागणी
अकोला, १ ऑक्टोबर (हिं.स.)। गोर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण देण्यासह विविध सात मागण्यांसाठी अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथे गोर बंजारा समाज आणि गोरसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधले. विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री यांच्या नावे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, बार्शीटाकळी यांच्यामार्फत शासनाकडे सादर करण्यात आले.
गोर बंजारा समाजाला एसटी-प्रवर्गांतर्गत आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून राज्यभर विविध लोकशाही मार्गांनी आंदोलने सुरू असल्याचे आंदोलकांनी सांगितले. महामोर्चे, आमरण उपोषण, साखळी उपोषण, रास्ता रोको तसेच ग्रामपंचायतींचे ठराव अशा विविध माध्यमांतून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
बार्शीटाकळी तालुक्यातील विविध तांड्यांनी ‘एक तांडा, एक दिवस’ या उपक्रमांतर्गत गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणात सहभाग घेतला आहे. मात्र, अद्याप शासनाकडून अपेक्षित निर्णय न झाल्याने समाजबांधवांनी नाराजी व्यक्त केली.
एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सहा नवयुवकांनी आत्मबलिदान केल्याचा दावा आंदोलकांनी केला. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तसेच कुटुंबातील एका पात्र व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
गोर बंजारा समाजाच्या विविध मागण्यांवर शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा आगामी निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा गोर बंजारा समाज आणि गोरसेनेच्या वतीने देण्यात आला.
दरम्यान, ST आरक्षणासह सात मागण्यांसाठी करण्यात आलेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. शासनाने आंदोलकांच्या मागण्यांचा तातडीने विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे