
शनिवारपासून सवलतीच्या तिकिटासाठी कार्ड किंवा पावती आवश्यक
अकोला बसस्थानकातील गोंधळ दूर करण्याची मागणी
अकोला, १ ऑक्टोबर (हिं.स.)। एसटी महामंडळाच्या प्रवासात ३ ऑक्टोबरपासून सवलतीच्या तिकिटांचा लाभ घेण्यासाठी NCMC कार्ड किंवा संबंधित पावती आवश्यक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अकोला बसस्थानकावर NCMC कार्ड नोंदणीची सुविधा सुरू करण्यात आली होती. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ही नोंदणी प्रक्रिया विस्कळीत झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सवलतीच्या तिकिटासाठी एनसीएमसी- कार्ड किंवा त्याची पावती आवश्यक असल्याने कार्ड काढण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच बाहेरगावातील नागरिक अकोला बसस्थानकावर येत आहेत. मात्र, बसस्थानकावर आल्यानंतर नोंदणी प्रक्रिया बंद असल्याचे निदर्शनास येत असल्याने अनेकांना आल्या पावली परत जावे लागत आहे.
विशेषतः बाहेरगावाहून कार्ड काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची यामुळे अधिकच गैरसोय होत आहे. नोंदणी प्रक्रिया नेमकी कोणत्या कारणामुळे बंद आहे आणि ती पुन्हा कधी सुरू होणार, याबाबत प्रशासनाकडून स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
शनिवार ३ ऑक्टोबरपासून सवलतीच्या तिकिटांसाठी एनसीएमसी- कार्ड किंवा पावती आवश्यक होणार असताना नोंदणी प्रक्रियेतील हा गोंधळ तातडीने दूर करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. नोंदणी केंद्र बंद ठेवायचे असल्यास त्याबाबत नागरिकांना पूर्वसूचना द्यावी, तसेच पर्यायी नोंदणीची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.
३ ऑक्टोबरची मुदत जवळ येत असताना एनसीएमसी कार्ड नोंदणी प्रक्रिया सुरळीत कधी होणार, असा सवाल महिला व ज्येष्ठ नागरिकांसह प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे