


अतिक्रमणांवर कारवाई न झाल्यास पुन्हा उपोषणाचा इशारा
रायगड, १ ऑक्टोबर (हिं.स.)। नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील विविध नागरी समस्या आणि वाढत्या अतिक्रमणांच्या मुद्द्यावरून गोरख शेप यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा चौथा दिवस राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींनी गाजला. कर्जतचे स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी सकाळी उपोषणस्थळी भेट देऊन प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. दरम्यान, प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर गोरख शेप यांनी सायंकाळी ७.१५ वाजता उपोषण तात्पुरते स्थगित केले.
नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील विविध प्रलंबित प्रश्नांवरून गोरख शेप यांनी २८ सप्टेंबर २०२६ पासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी आमदार महेंद्र थोरवे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. नागरिकांच्या तक्रारी आणि मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल त्यांनी ग्रामपंचायत व संबंधित प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.आमदार थोरवे यांनी गोरख शेप यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र, मागण्यांवर प्रत्यक्ष कार्यवाही आणि ठोस आश्वासन मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याची भूमिका शेप यांनी घेतली.
प्रशासनाकडून लेखी आश्वासन
दरम्यान, प्रशासनाकडूनही दिवसभर हालचाली वाढल्या. माधवराव गायकवाड, पंचायत समिती सदस्या सुनीता मोरे, नेरळच्या प्रशासक उज्वला भोसले, बांधकाम विभागाचे अधिकारी राहुल देवांग तसेच खालापूरचे गटविकास अधिकारी (BDO) यांनी उपोषणस्थळी भेट दिली.
नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल वरुटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गोरख शेप यांच्याशी सविस्तर चर्चा केली. ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी पुढील काही दिवसांत पूर्ण करण्यात येईल, असे लेखी निवेदन प्रशासनाकडून त्यांना देण्यात आले.
लेखी निवेदन प्राप्त झाल्यानंतर गोरख शेप यांनी सायंकाळी ७.१५ वाजता उपोषण तात्पुरते स्थगित केले. मात्र, उर्वरित अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर प्रत्यक्ष कारवाई सुरू न झाल्यास पुन्हा बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)