अकोला : शेतांचे पंचनामे तत्काळ पूर्ण करा - जिल्हाधिकारी
दुष्काळग्रस्त शेतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी मनरेगातून ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीचे निर्देश अकोला, १ ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे तत्काळ पूर्ण करावेत. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामी
Photo


दुष्काळग्रस्त शेतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

मनरेगातून ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीचे निर्देश

अकोला, १ ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे तत्काळ पूर्ण करावेत. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) माध्यमातून शेतरस्ते, विहिरी आदी कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेऊन ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगारनिर्मिती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले.

जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी येवता, येळवण आणि कानशिवणी येथे भेट देऊन दुष्काळी परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी तहसीलदार कुणाल झाल्टे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुषार जाधव, कृषी उपसंचालक हरिश देशमुख आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी कपाशी, सोयाबीन आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी पंचनामे सविस्तर व तपशीलवार करावेत. दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, प्रत्येक नुकसानीची काळजीपूर्वक नोंद घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या समस्या संवेदनशीलतेने जाणून घेऊन त्यांना शासनाच्या माध्यमातून अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच सद्यस्थितीत ग्रामीण भागात मनरेगाच्या माध्यमातून अधिकाधिक कामे राबवून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

नुकसानग्रस्त शेतांची पाहणी

येवता येथे शे. रशीद शे. इस्माईल आणि दीपक भोयर यांच्या शेतातील सोयाबीन पिकाच्या नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. येळवण येथे गुलाबराव ठाकरे यांच्या शेतातील सोयाबीन व तूर पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. तर कानशिवणी येथे यशवंत खोब्रागडे यांच्या शेतातील कपाशी आणि सुनीता मेश्राम यांच्या शेतातील सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या.

विविध योजनांच्या कामांची पाहणी

येळवण येथे गजानन पंडागे, गोपाळराव वाघमारे आणि नंदकिशोर वाघमारे यांच्या शेतांना भेट देऊन भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड, एचडीपीई पाईप व स्प्रिंकलर संच तसेच पोकराअंतर्गत सामूहिक शेततळे आदी कामांची पाहणी करण्यात आली.कानशिवणी येथे ई-पीक पाहणीअंतर्गत प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांची पडताळणीही करण्यात आली.

----------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande