
अकोला, १ ऑक्टोबर (हिं.स.)। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी स्वच्छता दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे तसेच स्वच्छ भारत अभियानाला बळकटी देणे, हा या दिनाचा प्रमुख उद्देश आहे.
महात्मा गांधी यांनी स्वच्छतेला विशेष महत्त्व दिले होते. त्यांच्या स्वच्छतेच्या विचारांचा प्रसार करण्यासोबतच प्रत्येक नागरिकाने आपले घर, परिसर, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, कार्यालये आणि गाव स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे. २ ऑक्टोबर २०१४ रोजी सुरू झालेल्या स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून देशभर स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यात आला आहे.
‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला प्रोत्साहन
राज्य शासनाच्या ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत स्वच्छतेसोबत विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येत आहेत. गावातील स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, सुरक्षित पाणी, पोषण, आजार प्रतिबंध आणि आरोग्य जनजागृती यावर भर देण्यात येत आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना पुरस्कार देण्यात येणार असल्याने ग्रामस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घेऊन गाव आरोग्य संपन्न करण्यासाठी स्वच्छतेचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्वच्छता दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी श्रमदान व स्वच्छता मोहिमा राबविण्यात येणार आहेत. प्रभात फेरी, स्वच्छता रॅली, जनजागृती फलक, घोषवाक्ये, निबंध, चित्रकला आणि भाषण स्पर्धांच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. अकोला जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्येही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अस्वच्छतेमुळे आजारांचा धोका
अस्वच्छ पाणी, दूषित अन्न आणि अस्वच्छ परिसरामुळे अतिसार, आमांश, कॉलरा, विषमज्वर (टायफॉइड) आणि कावीळ (हिपॅटायटिस-ए) यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. घराभोवती किंवा परिसरात पाणी साचल्यास डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियासारख्या आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे घरगुती कचऱ्याचे ओला व सुका असे विलगीकरण करणे, प्लास्टिकचा अनावश्यक वापर टाळणे, सांडपाणी साचू न देणे आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे आवश्यक आहे.
निरोगी राहण्यासाठी जेवणापूर्वी, अन्न तयार करण्यापूर्वी तसेच शौचालयाचा वापर केल्यानंतर साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धुवावेत. नियमित आंघोळ करणे, दात घासणे, नखे स्वच्छ ठेवणे, खोकताना व शिंकताना तोंड झाकणे, सुरक्षित पाणी पिणे आणि अन्नपदार्थ झाकून ठेवणे यांसारख्या सवयी अंगीकाराव्यात.
घरातील ओला व सुका कचरा स्वतंत्र ठेवून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. घराभोवती सांडपाणी साचू देऊ नये. शौचालयाचा नियमित वापर करून ते स्वच्छ ठेवावे. लहान मुलांचे लसीकरण वेळेवर करून घेणे आणि आजाराची लक्षणे आढळल्यास तत्काळ आरोग्य संस्थेशी संपर्क साधणे आवश्यक आहे.
“स्वच्छता ही केवळ एका दिवसाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची दैनंदिन सवय आणि सामाजिक जबाबदारी आहे. स्वच्छ घर, स्वच्छ परिसर आणि निरोगी समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा,” असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळिराम गाढवे यांनी केले.
-------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे