
देशी कट्टा, जिवंत काडतुसे व धारदार चाकूसह ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त
अकोला, १ ऑक्टोबर (हिं.स.)। अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गंभीर गुन्ह्याचा कट उधळून लावत तीन सराईत आरोपींना शस्त्रांसह ताब्यात घेतले. लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने शस्त्रे बाळगून फिरणाऱ्या आरोपींकडून देशी बनावटीचा कट्टा, दोन जिवंत काडतुसे, धारदार चाकू, मोबाईल व इतर साहित्य असा एकूण ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अकोला शहरात गस्त घालत असताना आणि कायदेशीर कारवाई करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ग्राम कानशिवनी येथे काही इसम देशी कट्टा व चाकू घेऊन फिरत असून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
माहितीची खात्री झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने ग्राम कानशिवनी येथील गोदामाजवळ सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत विजय अंबादास पवार याच्याकडून अंदाजे ४० हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा कट्टा तसेच मॅगझिनमधील दोन जिवंत काडतुसे, अंदाजे २ हजार रुपये किमतीची, जप्त करण्यात आली.
तसेच संदीप श्रीराम बहुरूप याच्याकडून लोखंडी धारदार चाकू, तर सुनील उर्फ वैभव देवबंद पाटील याच्याकडूनही शस्त्र जप्त करण्यात आले. तिन्ही आरोपींकडून मोबाईल व इतर साहित्य असा एकूण ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध कलम ६१(२) बीएनएस तसेच कलम ३ व २५ आर्म्स अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास व कायदेशीर कारवाई सुरू आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे