
लातूर, 01 ऑक्टोबर (हिं.स.)।
लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध मटका व जुगार व्यवसायाविरोधात नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने धडक कारवाई केली. लातूर शहरासह कासार शिरशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या तीन स्वतंत्र कारवायांमध्ये २२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून २ लाख ९७ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्यांनी अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक लातूर जिल्ह्यात रवाना केले होते.
गांधी मार्केटमध्ये मटका बुकीवर कारवाई
पथकाने गांधी मार्केट परिसरातील एका शटरमध्ये सुरू असलेल्या मटका बुकीवर छापा टाकला. या कारवाईत १५ हजार ६१० रुपये रोख आणि ५८ हजार रुपये किमतीचे सात मोबाईल, असा ७३ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६७१/२०२६, कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुळ मार्केट परिसरात दुसरी कारवाई
गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतच गुळ मार्केट ते सम्राट चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत आर. के. बारच्या शेजारील शटरमध्ये सुरू असलेल्या मटका बुकीवरही पथकाने कारवाई केली. यावेळी ३९ हजार ४३० रुपये रोख आणि २७ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल, असा ६६ हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा क्रमांक ६७२/२०२६, कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
कासार शिरशीत तिर्रट जुगारावर छापा
दरम्यान, कासार शिरशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसवेश्वर चौकाजवळ लाला मजकूरी यांच्या पत्र्याच्या शेडसमोर सुरू असलेल्या तिर्रट जुगारावरही पथकाने कारवाई केली. या कारवाईत २० हजार १०० रुपये रोख, सात मोबाईल आणि दोन मोटारसायकली, असा एकूण १ लाख ५७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दहा जणांविरुद्ध कासार शिरशी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४४/२०२६, कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या तीनही कारवायांमध्ये एकूण २२ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून ७५ हजार १४० रुपये रोख, १७ मोबाईल आणि दोन मोटारसायकली, असा एकूण २ लाख ९७ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोहेकॉ प्रदीप खानसोळे, पोहेकॉ गणेश राठोड, पोहेकॉ संदीप वाघाडे आणि पोहेकॉ गजानन डवरे यांनी सहभाग घेतला. पथकाच्या कारवाईबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis