
अकोला, १ ऑक्टोबर (हिं.स.)। मराठा समाजातील युवक-युवतींची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून होणारी अडवणूक व गैरसोय तातडीने थांबविण्यात यावी, तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक लाख रुपये मदत देण्यात यावी, अशा विविध मागण्या अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे करण्यात आल्या. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना नेमकी किती मदत देण्यात येणार, याबाबत स्पष्ट उल्लेख नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी महासंघाने केली आहे.
अनेक शेतकऱ्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज घेतले आहे. दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे हे कर्ज माफ करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच सुशिक्षित बेरोजगार युवकांनी वाहन व इतर व्यवसायांसाठी कर्ज मिळविण्याकरिता केलेले अर्ज तातडीने मंजूर करावेत आणि कर्जप्रक्रियेत येणाऱ्या अडचणी व विलंब दूर करावा, अशी मागणीही करण्यात आली.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक लाख रुपये आर्थिक मदत देण्याबरोबरच शेतमजुरांसाठी रोजगारनिर्मितीची कामे तातडीने सुरू करावीत, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे