कॉकपिटमधील धक्कादायक घटनेनंतर फ्लायदुबईची इस्रायलसाठीची सर्व उड्डाणे स्थगित
जेरुसलेम, 01 ऑक्टोबर (हिं.स.)। फ्लायदुबईच्या एफझेड१०७३ या विमानाचे अपहरण करून ते क्रॅश करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर संयुक्त अरब अमिरातीची विमान कंपनी फ्लायदुबई चर्चेत आली आहे. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमास-इस्रायल युद्ध सुरू झाल्यापासून ही अमिराती विमान
कॉकपिटमधील धक्कादायक घटनेनंतर फ्लायदुबईची इस्रायलसाठीची सर्व उड्डाणे स्थगित


जेरुसलेम, 01 ऑक्टोबर (हिं.स.)। फ्लायदुबईच्या एफझेड१०७३ या विमानाचे अपहरण करून ते क्रॅश करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर संयुक्त अरब अमिरातीची विमान कंपनी फ्लायदुबई चर्चेत आली आहे. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमास-इस्रायल युद्ध सुरू झाल्यापासून ही अमिराती विमान कंपनी इस्रायली नागरिकांना जगाशी जोडणारा प्रमुख आणि महत्त्वाचा हवाई दुवा ठरली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन इस्रायली अधिकाऱ्यांनी तपासाला वेग दिला आहे. दरम्यान, सुरक्षा आढावा पूर्ण होईपर्यंत फ्लायदुबईने इस्रायलसाठीची आपली सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत.

कॉकपिटमध्ये सहवैमानिकाने कॅप्टनवर हल्ला करून विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर इस्रायलच्या राजकीय आणि सुरक्षा वर्तुळात या घटनेवरून चर्चा सुरू झाली आहे.

इस्रायलच्या परिवहनमंत्री मिरी रेगेव यांनी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याकडे फ्लायदुबईची उड्डाणे तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, इस्रायलशी सहानुभूती नसलेल्या देशाच्या नागरिकाला वैमानिक म्हणून नियुक्त करणे हा विमान वाहतूक कराराचा भंग आहे.

दरम्यान, यूएईमधील इस्रायलचे माजी राजदूत अमीर हायेक यांनी घाईघाईने कठोर कारवाई करण्यास विरोध केला आहे. त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले, “फ्लायदुबई आणि एतिहादने अत्यंत कठीण काळातही इस्रायलची साथ दिली आहे. आपण तपास पूर्ण होण्याची प्रतीक्षा केली पाहिजे. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.”

मात्र, त्यानंतर अमिराती विमान कंपनीने तपास सुरू असताना फ्लायदुबईची इस्रायलला जाणारी आणि इस्रायलहून येणारी सर्व उड्डाणे स्थगित करण्याची घोषणा केली.विवाद वाढल्यानंतर विमान कंपनीने स्वतःहून इस्रायलसाठीच्या आपल्या सेवा तात्पुरत्या स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात फ्लायदुबईच्या प्रवक्त्याने सांगितले, “या तात्पुरत्या स्थगितीमुळे संबंधित अधिकाऱ्यांना त्यांचे काम सुरू ठेवण्यास आणि या घटनेशी संबंधित सर्व तथ्ये समोर आणण्यास मदत होईल.आम्ही सुरू असलेल्या तपासात पूर्ण सहकार्य करण्यास आणि आमच्या नेटवर्कमध्ये सुरक्षेचे सर्वोच्च मानक कायम ठेवण्यास पूर्णपणे कटिबद्ध आहोत.”

ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा फ्लायदुबई आपल्या जागतिक नेटवर्कचा विस्तार करत आहे. फ्लायदुबईने २०२० मध्ये इस्रायलसाठी नियमित उड्डाणे सुरू केली होती. २०२० मध्ये झालेल्या ऐतिहासिक अब्राहम करारानंतर काही काळातच ही सेवा सुरू झाली. या करारानुसार संयुक्त अरब अमिरातीने इस्रायलला सार्वभौम राष्ट्र म्हणून मान्यता दिली होती.फ्लायदुबईने २००९ मध्ये कामकाज सुरू केले आणि २०२० मध्ये इस्रायलसाठी नियमित उड्डाणे सुरू केली. यूएई आणि इस्रायलमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर काही काळातच ही सेवा सुरू करण्यात आली होती.

ऑक्टोबर २०२३ मध्ये हमासच्या नेतृत्वाखाली इस्रायलवर हल्ला झाला आणि युद्धाला सुरुवात झाली. त्यानंतर अनेक विदेशी विमान कंपन्यांनी दीर्घकाळासाठी इस्रायलसाठीची उड्डाणे बंद केली होती. मात्र, त्या काळात फ्लायदुबई आणि यूएईच्या अन्य विमान कंपन्यांनी संघर्ष सुरू असतानाही इस्रायलसाठी उड्डाणे सुरू ठेवली. त्यामुळे युद्धाच्या काळात परदेशात प्रवास करू इच्छिणाऱ्या इस्रायली नागरिकांसाठी फ्लायदुबई महत्त्वाचा हवाई संपर्क ठरली.

यूएईमार्गे पुढील प्रवास करणाऱ्या इस्रायली नागरिकांसाठीही ही विमान कंपनी महत्त्वाचे केंद्र बनली आहे. दुबईमार्गे प्रवासी आशिया, आफ्रिका आणि जगातील इतर भागांतील विविध ठिकाणांशी जोडले जाऊ शकतात. सध्या ही विमान कंपनी दर आठवड्याला सरासरी २,२०० उड्डाणे चालवते. ५६ देशांमधील १२५ हून अधिक ठिकाणांसाठी ती सेवा देते. तसेच एमिरेट्ससोबतच्या भागीदारीच्या माध्यमातून जगभरातील १०० हून अधिक देशांना हवाई सेवेद्वारे जोडते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande