
काबुल , 01 ऑक्टोबर (हिं.स.)।गुरुवारी सकाळी अफगाणिस्तानच्या हिंदुकुश प्रदेशात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. जर्मन भूविज्ञान संशोधन केंद्राच्या (जीएफझेड) माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.३ इतकी होती. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी सुमारे ६ वाजून ५९ मिनिटांनी भूकंप झाला.
जीएफझेडच्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्र ३६.०५ अंश उत्तर अक्षांश आणि ६८.८७ अंश पूर्व रेखांशावर होते. भूकंपाचे केंद्र जमिनीपासून केवळ १० किलोमीटर खोलीवर होते. भूकंपाची खोली कमी असल्यामुळे केंद्राच्या आसपासच्या परिसरात हादरे तुलनेने तीव्रतेने जाणवले. या धक्क्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि अनेक जण घराबाहेर पडले. प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
हिंदुकुश प्रदेश हा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या आसपासच्या भूकंपप्रवण क्षेत्रांपैकी एक आहे. त्यामुळे या भागात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवतात. विशाल हिंदुकुश-पामीर प्रदेशात उथळ तसेच खोलवर होणारे भूकंप आढळतात. यापैकी काही भूकंप पर्वतीय भागांखाली सुरू असलेल्या गुंतागुंतीच्या भूगर्भीय हालचालींशी संबंधित असतात.
हा संपूर्ण प्रदेश भारतीय आणि युरेशियन भूपट्टांच्या सततच्या टकरीच्या क्षेत्रात येतो. या भूपट्टांच्या हालचालींमुळे हिमालय, हिंदुकुश आणि आसपासच्या पर्वतीय प्रदेशांमध्ये वारंवार भूकंप होतात. गुरुवारच्या भूकंपाची खोली कमी असणे ही महत्त्वाची बाब आहे. कारण जमिनीच्या पृष्ठभागाजवळ होणाऱ्या भूकंपांमुळे त्याच तीव्रतेच्या खोलवर होणाऱ्या भूकंपांच्या तुलनेत भूकंपाच्या केंद्राजवळ अधिक तीव्र हादरे जाणवू शकतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode