
इस्लामाबाद, 01 ऑक्टोबर (हिं.स.)।भारताने सिंधू जल करार (आयडब्ल्यूटी) स्थगित केल्यानंतर पाकिस्तानमधील जलसंकट अधिकच गंभीर झाले आहे. विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर पाकिस्तानला कोणत्याही देशाचा ठोस पाठिंबा मिळाला नसल्याने आता तो भारतासमोर मदतीची विनंती करत असल्याचे दिसत आहे. पाकिस्तानचे माहितीमंत्री अताउल्लाह तरार यांनी बुधवारी सांगितले की, भारताच्या या निर्णयाचा परिणाम पाकिस्तानच्या जनतेवर होत आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने याकडे लक्ष दिले नाही, तर पाकिस्तानातील लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित करताना, “रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही,” अशी भूमिका मांडली होती.
पाकिस्तानी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, तरार म्हणाले, “भारताला पाण्याचा शस्त्र म्हणून वापर करण्याची परवानगी आम्ही देऊ शकत नाही, कारण पाकिस्तानातील २४ कोटी जनतेचा हा मूलभूत अधिकार आहे. एखाद्या देशाने आंतरराष्ट्रीय जल करार एकतर्फी स्थगित केला, तर त्याचा परिणाम समान चौकटीअंतर्गत पाण्याचे वाटप करणाऱ्या इतर देशांवरही होऊ शकतो. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय समुदायासोबत चर्चा सुरू ठेवेल आणि आपल्या हितांचे रक्षण करेल.”
पाकिस्तानी मंत्र्यांनी आपल्या देशाच्या भूमिकेचे समर्थन करताना म्हटले, “आम्ही जिथे कुठे जातो, तिथे आम्ही स्वतःला सिंधू खोऱ्यातील लोक असल्याचे सांगतो, याचा मला खूप अभिमान आहे. आम्ही स्वतःला सिंधूच्या पाण्याशी जोडून पाहतो.”
ते पुढे म्हणाले, “सिंधू जल करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या, तेव्हा भारत असा निर्णय घेईल, अशी कल्पनाही करण्यात आली नसेल. हा कायदेशीर दस्तऐवज एकतर्फी रद्द करता येणार नाही. वादाची परिस्थिती निर्माण झाली तरी दोन्ही पक्षांनी करारातील अटी आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.”
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या संयुक्त राष्ट्र महासभेतील (यूएनजीए) भाषणाचा संदर्भ देत तरार म्हणाले, “आंतरराष्ट्रीय जलक्षेत्र आमच्या जनतेसाठी जीवनरेषा आहे. हा अधिकार हिरावून घेतला गेला, तर आमच्या लोकांचा मृत्यू होईल आणि अशा परिस्थितीला युद्धाची कृती (ॲक्ट ऑफ वॉर) मानले जाईल.”आंतरराष्ट्रीय सागरी सीमा कराराबाबत पाकिस्तानची भूमिका स्पष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, हा करार या प्रदेशातील शांतता आणि स्थैर्याचे साधन आहे.
भारताने सीमापार दहशतवादाचा दाखला देत सिंधू जल करार स्थगित करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. मात्र, पाकिस्तान स्वतःही दहशतवादाचा बळी ठरला असल्याचा दावा तरार यांनी केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode