
रायगड, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।
बुलढाणा जिल्ह्यातील तिहेरी हत्याकांडातील फरार आरोपीला नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी पनवेल एसटी स्टँड परिसरातून ताब्यात घेतले. दीपक फतेसिंग सुरडकर (वय ४४, रा. सोमठाणा, ता. चिखली, जि. बुलढाणा) असे त्याचे नाव आहे.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ९ ऑक्टोबर रोजी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान हाताला जखम झालेला संशयित पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी केली असता, जमिनीच्या वादातून आई सरस्वती (७५), भाऊ संजय (४८) आणि पुतण्या रजित (२१) यांची हत्या केल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्या आदेशानुसार झालेल्या या कारवाईनंतर आरोपीला पुढील तपासासाठी बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)