
सोलापूर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।स्पा सेंटरच्या नावाखाली कथितरीत्या बेकायदेशीर वेश्याव्यवसाय सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी जुळे सोलापुरातील फ्लोरा फॅमिली स्पा सेंटरवर छापा टाकला. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी स्पा सेंटरचा चालक अजय कांबळे (वय २७, रा. उत्तर कसबा, सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुळे सोलापुरातील सी. बी. सी. इमारतीमधील गाळा क्रमांक २०० आणि २०८ येथे फ्लोरा फॅमिली स्पा सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष आणि गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे छापा टाकला.
या कारवाईदरम्यान स्पा सेंटरचा चालक महिलांकडून मसाज करून घेतल्यानंतर त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला. घटनास्थळी दोन पीडित महिला आढळून आल्या. त्यांची सुटका करण्यात आली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड