
सोलापूर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आणि विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तपासणी मोहीम तीव्र केली आहे. याचदरम्यान गोव्याहून सोलापूरच्या दिशेने येणारा मद्यसाठा वाहून नेणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सांगोला तालुक्यातील अनकढाळ गावाजवळील टोलनाक्यावर पकडला. या कारवाईत देशी आणि विदेशी मद्यसाठ्यासह ट्रक असा एकूण ८४ लाख ९ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. गोव्याहून सोलापूरकडे मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित ट्रकची तपासणी करण्यात आली. त्यावेळी ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर देशी आणि विदेशी मद्यसाठा आढळून आला. पथकाने चालकासह मुद्देमाल ताब्यात घेतला.
ट्रकच्या तपासणीत देशी मद्याचे १,०७१ बॉक्स आढळले. त्यामध्ये एकूण १ लाख ७ हजार १०० बाटल्या असल्याची माहिती देण्यात आली. याशिवाय रॉयल स्टॅग व्हिस्कीचे १२ बॉक्सही जप्त करण्यात आले.
उपलब्ध माहितीनुसार, देशी मद्याची किंमत ४२ लाख ८४ हजार रुपये, तर विदेशी मद्याची किंमत १ लाख ५५ हजार ५०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. ट्रकसह जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत ८४ लाख ९ हजार ५२० रुपये आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड