
अकोला, 11 ऑक्टोबर, (हिं.स.)। अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांना विजयी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
शिक्षकांशी थेट संपर्क साधून महायुतीलाच मतदान का करावे, या संदर्भात जनसंवाद साधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संबंध आणि जवळचा न पाहता विचार आणि सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी भाजपाच्या वतीने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटण्यात आल्या आहेत.
प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने किमान पाच शिक्षक मतदारांचे मतदान महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांना मिळवून द्यावे, अशी जबाबदारी सोपविण्यात आली असून त्याचे नियोजन सुरू आहे.
यासंदर्भात भारतीय जनता पार्टी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, संपर्क प्रमुख माजी मंत्री प्रवीण पोटे, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, शहराध्यक्ष जयंत मसने, महापौर शारदाताई खेडकर, विजय अग्रवाल, हर्षद साबळे, माधव मानकर, सुलभाताई दुतोंडे, मायाताई घुले, वैशालीताई पालीवाल, अंबादास उमाळे, उमेश पवार, गणेश अंधारे, चंद्रकांत अंधारे, रमण जैन, मनीष गावंडे, डॉ. अमित कावरे, राजेश नागमोते, पवन महल्ले, प्रा. राजेश बेले, दीपक गवई, प्रा. अनिल गासे, ॲड. रूपाली काकड, ॲड. देवाशिष काकड, विद्याधर काकड, प्रा. देशमुख, प्रा. गावंडे, प्रा. अनुप शर्मा, वसंत बाचुका, नाना कुलकर्णी, पोटे, विजयसिंह गहलोत, भिसने, जोशी गुरुजी, पाटील गुरुजी, रामदास लांडे आदींची उपस्थिती होती.
लवकरच भाजपाच्या वतीने महायुतीचे उमेदवार आणि शिवसेना नेत्यांचा संयुक्त शिक्षक संवाद कार्यक्रम होणार आहे. या संदर्भात शिवसेनेचे संपर्क प्रमुख माजी आमदार राजन साळवी यांची भाजपा नेत्यांसोबत बैठक झाली असून महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांना अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती या चार जिल्ह्यांतून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
काँग्रेसने सध्या अराजकता आणि भाजपाच्या विरोधात द्वेषबुद्धीने राजकारण सुरू केले असून भाजप नेत्यांवर खालच्या स्तरावर टीका करण्याचा प्रकार सातत्याने सुरू आहे. त्यामुळे महायुतीलाच विजयी करण्याचा निर्धार घेऊन भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागला असल्याची माहिती माधव मानकर यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे