

रायगड, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। कोल्हारे परिसरातील प्रलंबित नागरी प्रश्न आणि ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी ग्रामपंचायत सदस्य विजय रामचंद्र हजारे यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. अतिक्रमणे हटविणे, रखडलेली जलजीवन मिशन योजना पूर्ण करणे आणि ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्यासह विविध मागण्यांसाठी ते २३ ऑक्टोबरपासून कोल्हारे-बोपेले येथील साईबाबा मंदिरासमोरील चौकात बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहेत.
कोल्हारे, धामोते व बोपेले परिसरातील शासकीय जमिनी, राखीव उद्यान भूखंड आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवावीत, कोल्हारे, बोपेले, धामोते, हजारे नगर, रामकृष्ण नगर, उमानगर, कोल्हारे चारफाटा, गौतम नगर आणि स्वागत व्हिलेज या नऊ वस्त्यांतील जलजीवन मिशनची योजना पूर्ण करून पुरेसा व स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करावा, अशी त्यांची मागणी आहे.
ग्रामपंचायत कार्यालयाच्या रखडलेल्या दुरुस्तीचे काम पूर्ण करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, माजी सरपंच व प्रशासकांच्या कार्यकाळातील कथित अनियमितता, बांधकामविषयक दाखले आणि करआकारणीच्या तक्रारींची चौकशी करावी, तसेच फेब्रुवारी २०२१ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीतील ग्रामपंचायतीच्या संपूर्ण दप्तराची तपासणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. श्री क्षेत्र संगमेश्वर येथील पांडवकालीन शिवमंदिरासमोरील मंजूर रस्त्याचे कामही तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी; अन्यथा २३ ऑक्टोबरपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा हजारे यांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन प्रश्न मार्गी लावणार का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)